ठाण्याची लोकसभेची जागा कोणाच्या नावावर होणार? एकनाथ शिंदे यांचा शिलेदार की उद्धव ठाकरेंचा निष्ठावंत? : ठाणे, (दि. १४ मे २०२४) शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ठाण्याची ओळख आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या तालमीत ठाण्यातील अनेक नेते घडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, माजी महापौर नरेश म्हस्के हे त्यापैकी आहेत. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतरही राजन विचारे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. तर, नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत राहिले. 2019 चा अभ्यास केला तर शिवसेना अखंड होती तेव्हा ठाण्यातील या जागेसाठी ठाण्यातील सर्व नेत्यांनी हि जागा जिकण्यासाठी अपार मेहनत केली होती. 2019 च्या नलोकसभा निवडणुकीत नरेश म्हस्के यांनी देखील राजन विचारे यांना मदत केली होती. मात्र आता ही लढत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी होईल याचा विचार देखील कोणी केला नव्हता. मात्र आता या लोकसभा निवडणुकीत राजन विचारे यांनी विशेष कामे केली नसल्याचा आरोप विरोधक करत आहेत. खासदार राजन विचारे हे तिसऱ्यांदा लोकसभा लढवत आहे. त्यामुळे राजन विचारे यांचा प्रचार गेल्या महिन्यांपासून सुरु आहे. नरेश म्हस्के यांची उमेदवारी १ मे रोजी जाहीर झाल्याने नरेश म्हस्के यांच्याकडे प्रचारासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी आहे.
भारतीय सीमांकन आयोगाने 2008 मध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विभाजन करून ठाणे आणि कल्याण असे दोन मतदारसंघ तयार केले. 1998 च्या आधी या लोकसभा मतदारसंघावर भाजपचे नाव होते. 1998 नंतर धर्मवीर आनंद दिघे यांनी हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळवून दिला. 1998 मध्ये शिवसेने तर्फे प्रकाश परांजपे निवडून आले. त्यानंतर 1999 आणि 2004 मध्ये देखील प्रकाश परांजपे हे खासदार झाले. मात्र 2009 ला राष्ट्रवादीचे संजीव नाईक यांनी शिवसेनेला धक्का देत शिवसेनेच्या विजय चौगुले यांचा पराभव केला. त्यानंतर शिवसेनेमध्ये अस्वस्थता पसरली. परंतु 2014 मध्ये शिवसेनेचे राजन विचारे पुन्हा एकदा संजीव नाईक यांचा पराभव करत खासदार झाले. 2019 ला देखील राजन विचारे यांनी राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आजही ठाण्याची लढाई निष्ठावंत विरुद्ध गद्दार, असली शिवसेना आणि नकली शिवसेना, आनंदी दिघे यांचे खरे शिष्य आणि खोटे शिष्य अशा शाब्दिक हल्लाबोलाने रंगलेली पाहायला मिळत आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात मीरा भाईंदर, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा, ठाणे, ऐरोली , बेलापूर अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यामध्ये मीरा-भाईंदर विधानसभा क्षेत्रात गीता जैन (अपक्ष- भाजप पाठिंबा), कोपरी पाचपाखाडी विधानसभा क्षेत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (शिवसेना), ओवळा माजीवडा विधानसभा क्षेत्रात प्रताप सरनाईक (शिवसेना), ठाणे विधानसभा क्षेत्रात संजय केळकर (भाजप), ऐरोली विधानसभा क्षेत्रात गणेश नाईक (भाजप), आणि बेलापूर विधानसभा क्षेत्रात मंदा म्हात्रे (भाजप) हे आमदार आहेत. एकूणच सहा पैकी पाच जागा महायुतीकडे असून एक जागा अपक्ष असली तरी भापलाचा पाठिंबा असल्याने ही जागा युतीचीच गणली जाते. त्यामुळे येत्या 20 मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदार कुणाला कौल देणार हे 4 जून रोजी निकालाच्या दिवशी समोर येईल.