मिरा भाईंदर शहरात प्राणी मित्रांकडून भटक्या श्वानांच्या संरक्षणासाठी श्वानांच्या गळ्यात रेडियमचे पट्टे :
Mira Bhayanadar : महामार्गावर अनेक अपघात घडत असतात, विशेषतः अनेक अपघाता नंतर असे समोर आले आहे की महामार्गावर भटके श्वान हे रस्ता ओलांडताना अपघातग्रस्त झाले आहेत. रात्रीच्या वेळी वेगाने येणारे दुचाकी, कार, ट्रक डंपर समोर अचानकपणे आल्यामुळे भटक्या श्वानांना काही समजण्यापूर्वीच अपघात घडतो. त्यामुळे हे अपघात त्यांच्या जीवावर बेतले जातात. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे वाहने एखाद्या श्वानाला धडकल्या नंतरही थांबत नाहीत. त्यांना महामार्गावर मरण्यासाठी सोडले जाते व त्यांच्याकडे कोणाचे सहसा लक्ष ही जात नाही.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर श्वानांचे होणारे वाढते अपघात लक्षात घेता मिरा भाईंदर शहराच्या प्राणी मित्रांनी अक्षय तृतीयाच्या निमित्ताने श्वानांचा जीव वाचविण्यासाठी रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या श्वानांच्या गळ्यात रेडियमचे पट्टे घातले. भटक्या श्वानांमुळे होणारे रस्ते अपघात व श्वानांचे अपघात रोखण्यासाठी व अपघात कमी करण्याच्या उद्देशाने त्यांना रेडियमचे पट्टे घालण्याचा विचार प्राणी मित्र शीतल तेंडुलकर यांच्या मनात आला. प्राणी मित्र शीतल तेंडुलकर यांनी त्यांचे काही प्राणी मित्र आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काशिमिरा येथील काही कार्यकर्त्यांना हि कल्पना सांगितली आणि श्वानांचे अपघात कमी करण्याच्या उद्देशाने अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर शीतल तेंडुलकर, मनसे विभाग अध्यक्ष गणेश झा, सचिन जांभळे, मनोज पवार, करण हरिजन, शकील पटेल, विनोद उगले, नितेश हुमणे, गौरव मुनतोंडे यांनी रात्रीच्या वेळेत काशिमीरा परिसरात फिरून श्वानांना रेडियमचे पट्टे घातले.
श्वानांच्या गळ्यात रेडियमचे पट्टे घालण्याचे काय फायदे ?
आपण हे अपघात रोखू शकतो. महामार्गावर अनेक ठिकाणी दुकाने व मानवी वस्ती असल्याने कुत्रे व मांजर देखील आसपास दिसून येतात. महामार्गावर भटकणाऱ्या कुत्र्यांच्या गळ्यात कॉलरसारखे रेडियम पट्टे घातल्याने त्यावर वाहनाचे हेडलाईट पडल्यावर पट्ट्यातील रेडियममुळे रेडियम चमकू लागते त्यामुळे कितीही अंधार असेल व दाट धुके असले तरी कमी प्रकाशाच्या स्थितीत कुत्र्याच्या उपस्थितीबद्दल ड्रायव्हरला जाणीव होते आणि अपघाताचा धोका कमी होतो. रस्त्यावरील श्वानांना कॉलरसारखे रेडियम पट्टे घातल्याने श्वानांना सुरक्षित ठेवण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे.
[…] हे हि वाचा : मिरा भाईंदर शहरात प्राणी मित्रांकडून… […]