बँकेचे अँप व्हेरीफाय करायचे आहे सांगून भाईंदरच्या बँक खातेदाराची आर्थिक फसवणूक: अनोळखी इसमाकडून 4.02 लाख रुपयांची फसवणूक
भाईंदर : दिवसेंदिवस वाढणारी सायबर गुन्हेगारी सर्वसामान्य नागरिक आणि पोलिसांसाठी एक मोठं संकट बनली आहे. प्रत्येक वेळी एक नवीन गुन्हा पद्धत समोर आल्यावर सायबर चोर त्यावरून नवीन तंत्र विकसित करतात. सध्या, सायबर चोर ‘अॅप’ चा वापर करून फसवणुक करण्याचे नवनवीन उपाय शोधत आहेत. बँकांच्या अॅप्ससारखी खोटी अॅप्स तयार करून केवायसी अपडेट, व्यवहार अपडेट करणे, खाते बंद झालं असल्याचं सांगून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे.
बँकेच्या अॅप्सचा वापर ऑनलाइन आर्थिक व्यवहारांसाठी सुरक्षित मानला जातो. इतर सर्व सुविधांसह, जसे आयएमपीएस, एनईएफटी, चेकबुक, क्रेडिट-डेबिट कार्ड, बँक स्टेटमेंट इत्यादी, या अॅप्सद्वारे पुरविल्या जातात. त्यामुळे नागरिक बँकांचे अॅप्स त्यांच्या मोबाइलमध्ये डाउनलोड करून ठेवतात. सायबर चोर याच मानसिकतेचा गैरफायदा घेत, विविध कारणांवरून लिंक पाठवून, हुबेहूब दिसणारी अॅप्स डाउनलोड करण्यास भाग पाडून त्यांच्याकडून आर्थिक फसवणूक करत आहेत. असाच काही प्रकार भाईंदर मध्ये घडला आहे.
भाईंदर पूर्व येथे राहणाऱ्या विजय कृष्णा काते (वय 59) यांच्यासोबत ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचा प्रकार घडला असून, त्यांचे पंजाब नॅशनल बँक खाते हॅक करून 4.02 लाख रुपये काढण्यात आले आहेत. ज्यावेळी तक्रारदार यांना पंजाब नॅशनल बँकमधून बोलत असल्या बाबत फोन आला व त्याने पीएनबी वन अँप हे व्हेरीफाय करण्यासाठी व्हॉटस अँप वर पीएनबी वन ही एपीके फाईल पाठविली त्याचवेळी तक्रारदार यांचे पीएनबी वन हे ॲप चालत नसल्याने फसवणूक करणारा व्यक्ती हा खर बोलत असल्याचे वाटले.
ही बातमी देखील वाचा : बनावट व्हीसा व पासपोर्ट वापरून वास्तव्य करणारे ३ नायझेरीयन नागरिकांना अटक
फसवणुकीची पद्धत:
दि. 20 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता, विजय काते यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून कॉल आला. कॉल करणाऱ्याने स्वतःला पंजाब नॅशनल बँकेचा अधिकारी असल्याचे सांगून त्यांचे PNB One अॅप व्हेरिफाय करण्यास सांगितले. व्हॉट्सअॅपवर पाठवलेल्या एका APK फाईलद्वारे त्यांना बँकेची सर्व माहिती भरायला सांगितली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी बँक खात्याची स्थिती तपासली असता, त्यांचे 1,55,827.49/- रुपये शिल्लक रक्कमेसह एकूण 4.02 लाख रुपये खात्यातून काढले हेले होते त्यापैकी फसवणूकदाराने 2.48 लाख रुपयांचे लोन घेऊन उर्वरित रक्कम काढून घेतली आहे.
तक्रार आणि पुढील कारवाई:
फसवणुकीची जाणीव होताच, विजय काते यांनी त्वरित सायबर हेल्पलाईन 1930 वर कॉल करून तक्रार नोंदवली असून, त्यांनी नवघर पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली आहे. संबंधित मोबाईल क्रमांक धारकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, सायबर गुन्हे शाखेच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला जात आहे.
सतर्कता आवश्यक!
तुमच्या बँकेशी संबंधित कोणतीही अॅप्स किंवा लिंक अनोळखी व्यक्तीकडून आलेली असल्यास उघडू नका. अधिकृत बँकिंग अॅप्स फक्त अधिकृत प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअरवरूनच डाउनलोड करा. कोणालाही OTP, बँक खाते डिटेल्स किंवा पर्सनल माहिती शेअर करू नका.