घरात घुसून वृद्ध महिलेला ८ तास जीवघेणी मारहाण; दागिने लुटून चोर पसार
मिरा रोड, दि. ६ डिसेंबरः घरात इलेक्ट्रीक काम करायचे आहे असं सांगत घरात शिरलेल्या एका चोराने ७२ वर्षीय वृद्ध महिलेला तब्बल आठ तास अमानुष मारहाण करत तिचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना मिरा रोड पूर्वेच्या नयानगर परिसरात बुधवारी रात्री घडली.
घटनेचा तपशीलः
अर्पण अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या फातिमा जुवाले (७२) यांच्या घरात मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती इलेक्ट्रिशियन असल्याचे सांगून शिरला. घरात प्रवेश करताच त्याने वृद्ध महिलेचा मोबाईल हिसकावला आणि तिच्याकडे मौल्यवान वस्तू देण्याची मागणी केली. महिलेकडे काहीही नसल्याचे सांगताच चोराने तिला गळा दाबून, तोंडावर आणि छातीवर वारंवार मारहाण केली.
हेही वाचा : चाकूने वार करून खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला एका वर्षानंतर अटक
आरोपीने रात्री साडेनऊपासून पहाटे पाच वाजेपर्यंत महिलेवर जबरदस्ती केली. घरातील इमारतीखाली खाद्यपदार्थांचे व्यवसाय असल्यामुळे पळून जाण्यासाठी त्याला योग्य वेळ मिळत नव्हता. त्यामुळे वृद्ध महिलेने आरडाओरड करू नये म्हणून त्याने तिला मारहाण सुरू ठेवली.
चोराचा उघडकीस आलेला प्रकारः
पहाटे पाच वाजता चोरट्याने वृद्ध महिलेचे दागिने लुटले आणि घरातून पळून गेला. सकाळी कामाला आलेल्या गृहसेविकेने ही घटना उघडकीस आणली. घटनेनंतर महिलेची प्रकृती गंभीर असून, तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिस तपास सुरूः
या घटनेची नोंद नयानगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या अमानुष घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांचे आवाहनः
एकट्या राहणाऱ्या नागरिकांनी अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश देताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.