मिरा-भाईंदरच्या विकासाला वेग : फेब्रुवारीत मेट्रो धावणार, रस्त्यांसाठी १२०० कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर — मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांनी आज मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली. या बैठकीत शहरातील वाहतूक, पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण, आरोग्य सेवा आदींचा समावेश असलेल्या तब्बल २५ विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या बैठकीत चेना रिव्हर वॉटरफ्रंट रस्ता, शिवसृष्टी मार्ग, खाडी किनारा विकास प्रकल्प, नवीन पालिका मुख्यालय, जरीमरी तलावातील ५१ फुटी विठ्ठल मूर्ती, क्लस्टर योजना, आरोग्य सेवा सुधारणा तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना पालिका सेवेत सामावून घेण्याबाबत चर्चा झाली. यावेळी मंत्री सरनाईक यांनी मेट्रो-९ चा पहिला टप्पा फेब्रुवारी महिन्यात नागरिकांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती देत, मिरा-भाईंदरकरांची मेट्रोसाठीची प्रतीक्षा आता संपणार असल्याचे स्पष्ट केले.

महिला सक्षमीकरणाला चालना : ‘उमेद’ मॉल व महिला हॉस्टेलसाठी निधी मंजूर

महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या ५० कोटी रुपयांच्या निधीतून मिरा-भाईंदरमध्ये भव्य ‘उमेद’ मॉल उभारण्याचे निर्देश आयुक्तांना देण्यात आले आहेत. तसेच शहरात महिलांसाठी स्वतंत्र हॉस्टेल उभारण्यासाठी राज्य शासनाकडून ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यासाठी लवकरच योग्य जागा निश्चित केली जाणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

खड्डेमुक्त शहरासाठी १२०० कोटींचा ‘बूस्टर डोस’

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून यापूर्वी शहर विकासासाठी १४०० कोटी आणि रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ९०० कोटी असा एकूण २३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर आता रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणासाठी अतिरिक्त १२०० कोटी रुपयांचा निधी उपमुख्यमंत्र्यांनी मंजूर केला असून, येत्या महिन्यात यासाठी निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. या निधीच्या माध्यमातून पुढील दीड ते दोन वर्षांत मिरा-भाईंदर शहर पूर्णपणे खड्डेमुक्त करण्याचा निर्धार मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.

मिरा-भाईंदर होणार ‘वाय-फाय फ्री सिटी’

बीओटी (Build-Operate-Transfer) तत्त्वावर संपूर्ण मिरा-भाईंदर शहर मोफत वाय-फाय सुविधेने सज्ज करण्यात येणार असून, यासाठी येत्या दोन ते तीन महिन्यांत निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

दर महिन्याला जनता दरबार

यावेळी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “मिरा-भाईंदरचा लोकप्रतिनिधी म्हणून शहराला अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज करणे हे माझे कर्तव्य आहे. निवडणुकीपूर्वी दिलेल्या वचनांची पूर्तता करण्यासाठी दर महिन्याला ‘जनता दरबार’ घेण्यात येईल. नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेऊन त्या तात्काळ सोडवण्याचा आमचा प्रयत्न असेल. तसेच पालिका प्रशासनाच्या कामकाजाला गती देण्यासाठी दर महिन्याला आयुक्त स्तरावर आढावा बैठक घेतली जाईल. मिरा-भाईंदरचा विकास कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही, ही माझी जबाबदारी असून ती मी पूर्ण करणार आहे.”

You May Also Like

भाईंदरमध्ये आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला, अंगावर गरम पाणी फेकलं

भाईंदरमध्ये आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला,अंगावर गरम पाणी फेकलं सहाय्यक पोलीस निरीक्षकासह…