धोकादायक झाडांची वेळेत छाटणी न केल्याचा आरोप; मनसेचे मिरा-भाईंदर महापालिकेत अनोखे आंदोलन

सत्य परिचित – भाईंदर (प्रतिनिधी) ८ जुलै :  मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांची पूर्णपणे छाटणी न केल्याचा आरोप करत  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिकेत अनोखे आंदोलन केले. मनसेचे विधानसभा अध्यक्ष सचिन पोपळे आणि शहर पदाधिकारी रॉबर्ट डिसोझा यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी अंगावर झाडांच्या फांद्या लटकवून प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा निषेध नोंदवला.

मिरा-भाईंदर मनसे आंदोलन : मनसेच्या म्हणण्यानुसार, पालिकेकडून पावसाळ्यापूर्वी शहरातील केवळ काही ठिकाणीच झाडांची छाटणी करण्यात आली. अनेक धोकादायक झाडांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

महापालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या काही दिवसांच्या मुसळधार पावसात मिरा-भाईंदर शहरात ५७ ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वृक्ष प्राधिकरणाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मनसेने संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली.

मनसेचे उपजिल्हाध्यक्ष हेमंत सावंत यांनी आरोप केला की, धोकादायक झाडांचे वेळेत सर्वेक्षण आणि छाटणी झाली असती तर अशा अनेक घटना टाळता आल्या असत्या. त्यांनी निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शहरातील सर्व धोकादायक झाडांची तातडीने पाहणी करून छाटणी करण्याची मागणी केली.

यावेळी कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

You May Also Like

महापालिका आवारातील धोकादायक झाडावर दुर्लक्ष; आणखी एका दुर्घटनेची प्रशासन वाट पाहत आहे का?

महापालिका आवारातील धोकादायक झाडावर दुर्लक्ष; आणखी एका दुर्घटनेची प्रशासन वाट पाहत आहे…