महापालिकेच्या विलंबामुळे पालकांमध्ये संभ्रम; विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत चिंता
सत्य परिचित – भाईंदर (प्रतिनिधी) ८ जुलै : ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाने पालकांना केवळ शासनमान्य आणि अधिकृत शाळांमध्येच विद्यार्थ्यांचा प्रवेश घेण्याचे आवाहन केले असताना, मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील अनधिकृत शाळांची अधिकृत यादी अद्याप जाहीर न झाल्याने पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन अनेक दिवस उलटले तरी महापालिकेकडून कोणतीही अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.
शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, पालकांनी प्रवेशापूर्वी संबंधित शाळेची शासनमान्यता, यू-डायस (UDISE) नोंदणी आणि इतर आवश्यक परवानग्यांची खातरजमा करावी. केवळ आकर्षक जाहिरातींवर विश्वास न ठेवता शिक्षण विभागाकडून माहिती पडताळून घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील तपासणीत कल्याण, बदलापूर आणि दिवा परिसरातील काही अनधिकृत माध्यमिक शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, मिरा-भाईंदरमध्ये अशी कोणतीही अधिकृत यादी अद्याप प्रसिद्ध झालेली नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
मिरा-भाईंदर अनधिकृत शाळा : गेल्या काही वर्षांत मिरा-भाईंदरमध्येही अनधिकृत शाळांची प्रकरणे समोर आली होती. अशा शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक नोंदी, परीक्षा पात्रता आणि पुढील प्रवेश प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे दरवर्षी सर्वेक्षण करून अनधिकृत शाळांची माहिती प्रसिद्ध करणे अपेक्षित असते.
गतवर्षी काही बेकायदा शाळांवर कारवाई झाल्यानंतर यंदाही शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी यादी जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप ती प्रसिद्ध न झाल्याने काही पालकांनी अनवधानाने अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेतला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी मागील आठवड्यात अनधिकृत शाळांची यादी तातडीने जाहीर करण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली होती. मात्र, त्यानंतरही यादी प्रसिद्ध न झाल्याने आयुक्तांच्या निर्देशांची अंमलबजावणी कोणत्या टप्प्यावर आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ठाणे जिल्हा शिक्षण विभागाने पालकांना आपल्या परिसरात कोणतीही अनधिकृत शाळा सुरू असल्याची माहिती मिळाल्यास ती तात्काळ शिक्षण विभाग किंवा संबंधित प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचे आवाहन केले आहे.
आता ठाणे जिल्हा शिक्षण विभागाने अनधिकृत शाळांविरोधात कठोर भूमिका घेतली असताना, मिरा-भाईंदर महापालिकाही तातडीने अधिकृत यादी जाहीर करून पालकांचा संभ्रम दूर करते का, याकडे विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
या संदर्भात मिरा-भाईंदर महापालिकेच्या शिक्षण विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, बातमी प्रसिद्ध होईपर्यंत त्यांची अधिकृत प्रतिक्रिया प्राप्त झाली नव्हती. प्रतिक्रिया प्राप्त झाल्यानंतर ती प्रसिद्ध करण्यात येईल.