भाईंदर पश्चिम तलाठी कार्यालयात गंभीर अनियमितता
कार्यालयाला कुलूप, नागरिक रांगेत; महसूल नियमांचे उल्लंघन उघड**
सत्य परिचित – भाईंदर (प्रतिनिधी) 13 डिसेंबर : भाईंदर पश्चिम येथील नगर भवन, तळमजला येथे असलेल्या तलाठी कार्यालयात गेल्या अनेक दिवसांपासून गंभीर अनियमितता सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कार्यालयाच्या कामकाजाच्या वेळेत बाहेरून कुलूप लावून ठेवण्यात येत असून नागरिकांना तासनतास वाट पाहावी लागत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
शुक्रवार, दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी दुपारच्या सुमारास तलाठी कार्यालय बाहेरून कुलूपबंद आढळून आले. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे कार्यालयाच्या आत दोन कर्मचारी प्रत्यक्ष काम करत असल्याचे दिसून आले. कार्यालयाबाहेर जमीन व महसूल विषयक कामांसाठी अनेक नागरिक रांगेत थांबले होते.
मुर्धा गावातील रहिवासी महेश म्हात्रे हे आपल्या वृद्ध मातेसह सात-बारा दुरुस्तीसाठी अनेक दिवसांपासून फेऱ्या मारत असून, संबंधित तलाठी अमित मधाले यांनी त्यांना दुपारी २ वाजता कार्यालयात बोलावले होते. मात्र ठरलेल्या वेळी कार्यालय कुलूपबंद असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
या प्रकाराची माहिती मिळताच साप्ताहिक ‘सत्य परिचित’ चे संपादक इरफान सैय्यद यांनी 112 क्रमांकावर तक्रार दाखल केली. त्यानंतर भाईंदर पोलीस बीट मार्शल घटनास्थळी दाखल झाले. तलाठी अमित मधाले यांच्या वाहनचालकाला बोलावून कार्यालयाचे कुलूप उघडण्यात आले. तपासणीदरम्यान कार्यालयात कर्मचारी उपस्थित होते, मात्र संबंधित तलाठी अधिकारी गैरहजर असल्याचे स्पष्ट झाले.
महसूल विभागाच्या नियमानुसार तलाठी कार्यालयाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ अशी निश्चित असून, अधिकारी कार्यालयाबाहेर गेल्यास सूचना फलकावर लेखी माहिती देणे बंधनकारक आहे. मात्र मागील एक महिन्याहून अधिक काळापासून दुपारच्या वेळेत कार्यालय कुलूपबंद ठेवणे, तलाठी अधिकारी अनुपस्थित राहणे व नागरिकांना कोणतीही सूचना न देणे, ही बाब नियमितपणे घडत असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणाबाबत यापूर्वी 23 जानेवारी 2025 रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे ई-मेलद्वारे तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

या गंभीर प्रकरणाची दखल नवभारत टाइम्स आणि दुपहर दो बजे या वृत्तपत्रांनी घेतली असून, आता महसूल विभागाकडून चौकशी व दोषींवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
