MNS Slap non Marathi shopkeeper मिरारोड: दिनांक २९ जुलै रोजी मिरारोड येथील एका अमराठी दुकानदाराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याच्या घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकाराचा निषेध म्हणून मिरारोड-भाईंदरमधील काही व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून मोर्चा काढला. सकाळी आंदोलनामध्ये व्यापारी व व्यवसायिकांची संख्या कमी होती. मात्र हळूहळू यामध्ये भाजप कार्यकर्ते व व आमदार नरेंद्र मेहता यांचे समर्थक यांचा हस्तक्षेप वाढला. या सर्व मोर्चाला राजकीय रंग देण्याचे काम शिवसेना पक्षाच्या नेते व भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलं. आंदोलनाला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी फूस लावली, असा गंभीर आरोप मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे.
जाधव म्हणाले की, “आज ज्या ठिकाणी बंद पाळण्यात आला, तो खूप छोटासा परिसर होता. केवळ २५ ते ५० व्यापाऱ्यांनीच हा बंद पुकारला होता. हा व्यापाऱ्यांचा नव्हेच, तर भाजपच्या नेत्यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा कार्यक्रम होता. मराठी माणसा विरोधात भाजपनेच हे आंदोलन उभं केलं,” असा आरोप त्यांनी केला. ठाण्यात देखील काही दिवसांपूर्वी एका मराठी माणसाला भर रस्त्यात परप्रांतीय 4 ते 5 दुकानदारांकडून मारहाण झाली होती, त्याचा व्हिडिओ आमदार नरेंद्र मेहता यांनी पोस्ट का नाही का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
जाधव यांनी स्पष्ट केलं की, भाजप नेत्यांनी फक्त ४० सेकंदांचा व्हिडीओ कट करून व्हायरल केला. व्हिडीओमध्ये जे दाखवलं आहे त्याच्या अगोदर व त्याच्यानंतर बरंच काही घडलं आहे. “राज्य सरकारने शाळांतील हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. त्याच वेळी त्या दुकानदाराने खोचकपणे विचारलं — ‘पण आमच्याकडे तर हिंदीच चालतं’. त्यावरूनच वाद झाला. एवढी वर्ष राहून देखील या दुकानदाराला महाराष्ट्राची भाषा मराठी आहे हे माहित नाही. असा गंभीर प्रश्न देखील जाधव यांनी उपस्थित केला.
जिल्हाध्यक्ष जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे काल रात्री मनसेचे कार्यकर्ते व स्वतः अविनाश जाधव व दुकान मालक बाबुलाल चौधरी यांच्यामध्ये वाद मिटल्याचे सांगितले. मात्र आज सकाळी मोर्चा कुठून निघाला हे आम्हालाही कळत नाही.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या दुकानदाराला महाराष्ट्राची भाषा विचारली, पण तो उत्तर देऊ शकला नाही. “असं लोकांना उत्तर द्यायला नको का?” असा सवाल करत जाधव यांनी मनसेच्या भूमिकेचं समर्थन केलं.