भामटा अमित शेट्टी अखेर पनवेल पोलिसांच्या जाळ्यात; कोट्यवधींची फसवणूक, पोलीस अधिकाऱ्यांनाही ‘गिफ्ट’ देऊन सुटला होता!
सत्य परिचित – पनवेल (प्रतिनिधी), 05 डिसेंबर : पनवेल, पुणे, श्रीवर्धन आणि म्हसळा परिसराला अनेक वर्षे हादरवणारा आर्थिक भामटा अमित अशोक शेट्टी (वय ३५ अंदाजे) अखेर पनवेल शहर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. दामदुप्पट योजनांचे हवाले देणे, बनावट कर्ज योजना दाखवून पैसे उकळणे, इतरांच्या नावावर मोबाईल लोन काढून फोन विकणे, क्रेडिट कार्डवर रक्कम काढून कार्डधारकांना फसवणे, तसेच दुचाकी-चारचाकी वाहनांचा गैरवापर असे एकापेक्षा एक शातिर गुन्हे त्याने केले असल्याचे समोर आले आहे.
पोलीस उपनिरीक्षक संजय अस्पतवार यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने शेट्टीचा माग काढत त्याला बेड्या ठोकल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेट्टीने विशेषतः गरीब आणि गरजू लोकांना सोपी कमाई, कमी व्याजाचे कर्ज, तातडीने आर्थिक मदत अशा खोट्या आश्वासनांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांना गंडा घातला. अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या उघड्यावर येण्याच्याच परिस्थितीत पोहोचल्याचे समजते.
सर्वात गंभीर बाब म्हणजे, याआधी अनेक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असतानाही अमित शेट्टी वारंवार सुटत होता. महागडे मोबाईल, ब्रँडेड घड्याळे, मौल्यवान गिफ्ट्स आणि विदेशी सहलींचा खर्च उचलून त्याने वरिष्ठ पोलीस अधिकारी व तपास अधिकाऱ्यांना हाताशी धरल्याचे आरोप नागरिक आणि तक्रारदारांकडून होत आहेत.
या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी कलम बी.एन.एस. ३१८(४), ३१६(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने अमित शेट्टीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासामध्ये आणखी मोठा घोटाळा उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
तक्रारदारांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे मागणी केली आहे की, पूर्वी ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी शेट्टीला मोकळे केले, त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी आणि स्वतंत्र चौकशी नेमण्यात यावी.
अमित शेट्टीकडून तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी फसवणूक झालेली असल्यास त्वरित पनवेल शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
या सर्व प्रकरणानंतर मोठा प्रश्न कायम आहे — कितीही भामटे पकडले तरी पोलीस दलातील भ्रष्टाचाराला आळा कधी बसेल?