सत्य परिचित – भाईंदर (प्रतिनिधी) 13 डिसेंबर : मिरा-भाईंदर शहराच्या सांस्कृतिक इतिहासात अविस्मरणीय सुवर्णक्षणाची नोंद झाली, जेव्हा बॉलीवूडचा सुप्रसिद्ध गायक शान मुखर्जी पहिल्यांदाच मिरा-भाईंदरमध्ये प्रत्यक्ष मंचावर अवतरला. प्रताप सरनाईक फाउंडेशनतर्फे आयोजित ‘संस्कृती आर्ट फेस्टिव्हल २०२५’ च्या उद्घाटनाच्या संध्याकाळी शानच्या सुरेल आवाजाने संपूर्ण शहर मंत्रमुग्ध झाले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मैदान, भाईंदर पूर्व येथे शानला पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी प्रचंड जनसागर उसळला होता. अनेक रसिकांनी “आपण ज्या गाण्यांना आजवर फक्त मोबाईल, टीव्ही आणि चित्रपटांत पाहिलं-ऐकलं, तीच गाणी समोर उभा असलेला शान गातोय… हे खरं आहे का?” अशा भावना व्यक्त केल्या. काही क्षण तर रसिकांना हा अनुभव स्वप्नवत वाटत होता.
शानने सादर केलेल्या बॉलीवूडच्या सदाबहार हिट्सवर प्रेक्षकांनी जल्लोष केला. गाण्यांवर ताल धरत, मोबाईलच्या फ्लॅशलाइट्सनी उजळलेलं मैदान आणि प्रत्येक सुरावर उमटणारी टाळ्यांची दाद—ही संध्याकाळ मिरा-भाईंदरकरांसाठी आयुष्यभर लक्षात राहणारी ठरली.

या आधी मिरा-भाईंदरमध्ये कधीही न आलेला शान, या फेस्टिव्हलमुळे प्रथमच शहरात आला असून, त्याच्या या पहिल्याच उपस्थितीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद संस्कृती आर्ट फेस्टिव्हलच्या यशाची साक्ष देणारा ठरला.
‘स्वप्नातील मीरा-भाईंदर’ ही संकल्पना घेऊन आयोजित या फेस्टिव्हलमध्ये उत्कृष्ट रांगोळ्या, राममंदिराची प्रतिकृती, अयोध्येतील भगव्या ध्वजाची झलक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा हे आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.

यावेळी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “मिरा-भाईंदरच्या कलात्मक आणि सांस्कृतिक क्षमतेवर माझा ठाम विश्वास आहे. शानसारखा कलाकार पहिल्यांदाच इथे येतो आणि त्याला मिळणारा प्रतिसाद हा शहराच्या सांस्कृतिक ओळखीचा विजय आहे.”
तर भावुक होत शान म्हणाला, “मिरा-भाईंदरच्या प्रेक्षकांची ऊर्जा विलक्षण आहे. इतका प्रेमळ प्रतिसाद मला फार कमी ठिकाणी अनुभवायला मिळतो. इथे पहिल्यांदाच गातोय, पण हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहील.”
१२ ते १५ डिसेंबर २०२५ दरम्यान सुरू असलेला संस्कृती आर्ट फेस्टिव्हल मिरा-भाईंदरला कला, संगीत आणि एकतेच्या रंगांनी सजवत असून, हा महोत्सव शहरासाठी एक नवा सांस्कृतिक मापदंड ठरत आहे.