सत्य परिचित – नवी मुंबई (प्रतिनिधी) 14 डिसेंबर : राज्याची उपराजधानी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन जोमात सुरू असताना, नवी मुंबईत मात्र कायदा व सुव्यवस्थेची सर्रास पायमल्ली होत असल्याचे गंभीर चित्र समोर येत आहे. ‘ऑर्केस्ट्रा बार’ व ‘लेडीज सर्व्हिस बार’ या परवान्यांच्या आड अनेक ठिकाणी खुलेआम डान्स बार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
नवी मुंबईतील बेलापूर परिसरातील एका तथाकथित व्हीआयपी लेडीज बारमध्ये अश्लील नृत्य, आक्षेपार्ह हावभाव आणि डान्सबारमध्ये होणाऱ्या अश्लील कृत्यांवर पैशांचा पाऊस टाकला जात असल्याचे व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवरच नव्हे, तर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
View this post on Instagram
विशेष म्हणजे, हे बार दररोज रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवले जात असून, पोलिस व संबंधित यंत्रणांची कोणतीही भीती नसल्याचेच यातून स्पष्ट होते. परवाना अटींचे उल्लंघन, सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता आणि सामाजिक शिस्तीला तडा देणाऱ्या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.
संस्कृती, परंपरा आणि सामाजिक मूल्यांचा अभिमान बाळगणाऱ्या महाराष्ट्रात, नवी मुंबईसारख्या आधुनिक शहरात सुरू असलेला हा उघड ‘नंगानाच’ केवळ नैतिक अधःपतनच दर्शवत नाही, तर परवाने देणाऱ्या व नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणांच्या दुर्लक्षाकडेही बोट दाखवतो.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा विधिमंडळात गाजवून, संबंधित बार मालक, व्यवस्थापक तसेच परवाना देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आता सर्वसामान्य नागरिक, सामाजिक संघटना आणि सुजाण घटकांकडून होत आहे. तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई न झाल्यास, कायदा केवळ कागदावरच उरला आहे, असा ठपका प्रशासनावर बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.