सत्य परिचित – भाईंदर  (प्रतिनिधी) 15 डिसेंबर : नायगाव पूर्व येथील मंगलमुर्ती ज्वेलर्स दुकान फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन आरोपींना नायगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून आरोपींना गजाआड केले.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी केशव भवन दुबे (वय ४३) हे नायगाव पूर्व येथील टिवरी रोडवरील किणी कॉम्प्लेक्स, सेवन स्केअर चौक येथे “मंगलमुर्ती ज्वेलर्स” नावाचे दुकान चालवतात. दि. ४ मार्च २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास तीन अनोळखी इसमांनी तोंडाला काळा कपडा बांधून संगनमताने दुकान फोडण्याचा प्रयत्न केला. या घटनेप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३१/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४), ६२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेची दोन पथके तयार केली. एका पथकाने घटनास्थळाच्या परिसरातील माहिती गोळा केली, तर दुसऱ्या पथकाने संशयितांच्या ये-जा मार्गांवर तपास सुरू केला. तपासादरम्यान गुन्हा करताना वापरलेली मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर (एमएच ४३ बीएक्स ७९३२) ही कार असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी सापळा रचला. संबंधित कार घोडबंदर परिसराकडे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारसह तीन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत —

  1. शफीक ललन अन्सारी (वय ३६) – चालक, रा. न्यू गौतम नगर, गोवंडी, मुंबई

  2. मेहबुब जानी सैय्यद (वय २०) – रिक्षाचालक, रा. भीमवाडी, गोवंडी, मुंबई

  3. शाकीर साजीद शेख (वय २२) – बेकार, रा. भीमवाडी, गोवंडी, मुंबई

ही कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहाय्यक पोलीस आयुक्त नवनाथ घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय कदम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

या कारवाईत सपोनि गणेश केकान, पोउपनिरी ज्ञानेश्वर आसबे, पोहवा शेखर पवार, सचिन ओलेकर, सचिन मोहिते, चेतन ठाकरे, सचिन खंताळ, जयवंत खंडवी, अशोक पाटील तसेच अमोल बरडे यांनी यशस्वी कामगिरी बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मेट्रो ट्रायल रनच्या नावाखाली मिरा-भाईंदरमध्ये पुन्हा अनधिकृत बॅनरबाजी?

  भाईंदर: (प्रतिनिधी) मिरा-भाईंदर मधील मेट्रो लाइन ९च्या पहिल्या टप्प्यातील काशीगाव ते…