Borivali Hotel Rat Found in Dosa Case: सत्य परिचित – बोरीवली | ०८ ऑक्टोबर : बोरीवलीतील एका हॉटेलमध्ये डोशामध्ये मृत उंदीर आढळल्याच्या घटनेने काही दिवसांपूर्वी मोठी खळबळ उडाली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संबंधित हॉटेलवर अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली होती. मात्र, आता याच प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून हॉटेल मालकाकडून लाखो रुपयांची मागणी केल्याचा आरोप दोन बहिणींवर करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ सप्टेंबर रोजी एक महिला, तिचा मुलगा आणि आणखी एक व्यक्ती बोरीवली पश्चिमेकडील एल. टी. रोडवरील राधाकृष्ण हॉटेलमध्ये गेले होते. त्यांनी डोसा आणि इतर खाद्यपदार्थ मागवले. डोसा खात असताना त्यामध्ये मृत उंदीर आढळल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर हॉटेलमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. संबंधित महिलेने पोलिसांना माहिती देत घटनेचा व्हिडीओही रेकॉर्ड केला.
यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला. प्रकरणाची दखल घेत २८ सप्टेंबर रोजी अन्न व औषध प्रशासनाने हॉटेलचा परवाना रद्द केला, तसेच हॉटेल बंद करण्यात आले.
हॉटेल बंद झाल्यानंतर पैशांची मागणी?
हॉटेल मालक जय किशोर शाह यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत गंभीर आरोप केले आहेत. हॉटेलवर कारवाई झाल्यानंतर संबंधित महिला आणि तिच्या बहिणीने त्यांच्याशी संपर्क साधल्याचे तक्रारीत नमूद आहे. पोलिसांत कारवाई करण्याची तसेच सोशल मीडियावर व्हिडीओ आणखी प्रसारित करण्याची धमकी देत पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे.
सुरुवातीला २५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानंतर बोलणी झाल्यानंतर ही रक्कम २० लाख, १५ लाख आणि अखेर ७ लाख रुपयांपर्यंत खाली आल्याचे पोलिस तक्रारीत म्हटले आहे.
यापैकी १ लाख रुपये ३० सप्टेंबर रोजी रोख स्वरूपात देण्यात आले, असा दावा हॉटेल मालकाने केला आहे. मात्र, उर्वरित ६ लाख रुपयांसाठी संबंधित महिलेकडून वारंवार फोन आणि व्हॉट्सॲप संदेश येत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी रचला सापळा
सततच्या पैशांच्या मागणीला कंटाळून हॉटेल मालकाने अखेर बोरीवली पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांच्या सूचनेनुसार ५ ऑक्टोबर रोजी दोन्ही महिलांना हॉटेलमध्ये बोलावण्यात आले.
संध्याकाळच्या सुमारास संबंधित महिलेने हॉटेल मालकाकडून ६ लाख रुपये रोख स्वीकारल्याचा दावा करण्यात आला. हा संपूर्ण प्रकार स्वतंत्र पंचांच्या उपस्थितीत पोलिसांनी पाहिल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, पोलिसांनी दोन्ही बहिणींना तत्काळ अटक न करता कायदेशीर प्रक्रियेनुसार नोटीस बजावली आहे. या प्रकरणी बोरीवली पोलिसांनी दोन्ही बहिणींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
डोशामध्ये उंदीर आढळल्याच्या घटनेपासून सुरू झालेल्या या प्रकरणाने आता ब्लॅकमेलिंगच्या आरोपामुळे नवे वळण घेतले आहे.