ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांच्या वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण विलंबासाठी शुल्क आकारण्यास स्थगिती
मुंबई Mumbai, दि. १३ जुलै, (प्रतिनिधी): राज्य सरकारचा मोठा निर्णय; वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण विलंबासाठी शुल्क आकारण्यास स्थगिती. राज्यातील ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांना यापूर्वी वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करण्यास विलंब झाला तर प्रति दिवस ५० रुपये एवढे विलंब शुल्क आकारण्यात येत होते. मात्र आता हे विलंब शुल्क आकारण्यात येणार नाही. १५ वर्षाच्या आतील सर्व परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास या विलंब शुल्काला राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. राज्य सरकारतर्फे पुढील आदेश येईपर्यंत ही स्थगिती कायम असणार असल्याचे परिवहन कार्यालयाने सांगितले आहे. याबाबत परिपत्रक काढण्यात आले असून शासन आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले आहेत.
मंत्री दादाजी भुसे यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑटो रिक्षा टॅक्सी व इतर परिवहन संवर्गातील वाहनधारक व संघटनांकडून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अनेक निवेदन देण्यात आले होते. मोटार वाहन कायद्याच्या नियमाप्रमाणे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण जर वेळेत केले नसल्यास विलंब शुल्क आकारण्यात येत होते. आता या विलंब शुल्काला राज्य सरकारने स्थगिती दिली असून राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.
वाहनचालकांमध्ये आनंदाचे वातावरण
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ऑटो रिक्षा टॅक्सी व विविध परिवहन संवर्गातील वाहनधारकांना दिलासा मिळाला असून या वाहनचालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्यात अधिकृत परवानाधारक असलेल्या रिक्षा, टॅक्सी व इतर परिवहन वाहनधारक चालकांना कोरोना काळानंतर अत्यंत तुटपुंज्या आर्थिक उत्पन्नावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत होता. अनेक वेळा रोजच्या कामात रिक्षा टॅक्सी चालकांना त्यांच्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र वेळेत प्राप्त करून घेण्यासाठी वेळ नसल्यामुळे व इतर काही खाजगी कारणांसाठी विलंब लागायचा. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असे.
शासनाने वाहनधारक व विविध संघटना यांच्या निवेदनांचा व मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर प्रस्तावास मान्यता दिली व त्यास अनुसरुन विधानसभा सभागृहात निवेदनाद्वारे १५ वर्षांच्या आतील सर्व परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणास विलंब झाल्यानंतर प्रतिदिन रुपये ५०/- एवढे विलंब शुल्क आकारण्याच्या कार्यवाहीस पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्याची घोषणा केली आहे. त्यासअनुसरुन शासनाने दि. ११ जुलै २०२४ रोजीच्या निर्देशाद्वारे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी येणाऱ्या १५ वर्षाच्या आतील सर्व परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यानंतर प्रतिदिन रुपये ५०/- इतके विलंब शुल्क आकारण्याच्या कार्यवाहीस पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. सर्व वाहन धारकांनी याची नोंद घ्यावी व आपली वाहने योग्यता प्रमाणपत्र नूतणीकरणासाठी प्रादेशिक / उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये सादर करावीत, असेही परिवहन आयुक्त श्री. भिमनवार यांनी म्हटले आहे.
५० रुपये विलंब शुल्क आकारण्याचा नियम फक्त आपल्याच राज्यात असल्याची बाब वसई विरारचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली
वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यानंतर प्रति दिवस ५० रुपये विलंब शुल्क आकारण्याचा नियम फक्त आपल्याच राज्यात असून इतर कोणत्याही राज्यात असे नियम नाहीत ही बाब वसई विरारचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. तसेच आमदार हितेंद्र ठाकूर यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रिक्षा टॅक्सी चालकांच्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करताना आकारण्यात येणारे विलंब शुल्क रद्द करावे अशी मागणी केली होती. याबाबत महाराष्ट्र शासनाकडून अधिकृत सोशल मीडिया एक्स वर ट्विट करण्यात आले आहे.