हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केली 21 लाखांची चोरी; काशीगाव पोलिसांकडून अटक
भाईंदर : (प्रतिनिधी) – मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय ( MBVV POLICE) अंतर्गत काशीगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुरखा परिधान करून रात्रीच्यावेळी हॉस्पिटलमध्ये शिरून चोरी करणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींकडून १८ लाख रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात काशीगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश मिळाले आहे.
मीरा रोडच्या विनय नगर मध्ये असलेल्या राधा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नेहमीप्रमाणे रुग्णांना तपासण्यासाठी वॉर्डमध्ये गेले असताना त्यांच्या कॅबिनमधील लाकडी कपाट तोडून त्यातील २१ लाख रुपयांची रक्कम चोरांनी लंपास केल्याचे लक्षात आले. कॅबिनमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रात्रीच्यावेळी एक अनोळखी इसम काळ्यारंगाचा बुरखा परिधान करून हॉस्पिटलमध्ये घुसून चोरी करत असल्याचे दिसून आले. यावरून काशिगाव पोलीस ठाण्यात अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून वरिष्ठांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे काशिगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी बारकाईने तपास करून पुरावे गोळा केले.
पोलिसांच्या तपासात हॉस्पिटलची संपूर्ण माहिती ज्या व्यक्तीला आहेत त्या व्यक्तीनेच चोरी केल्याचा संशय आला. यावरून चोर हॉस्पिटलमध्ये काम करणारा होता असल्याचा सुगावा मिळाला. त्या अनुषंगाने गुन्ह्याचा तपास केला असता हॉस्पिटलमध्ये पूर्वी काम करत असलेला आरोपी व त्याचे साथीदार यांनी हा गुन्हा केला असल्याचे स्पष्ट झाले. या गुन्ह्यात एकूण तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून हॉस्पिटलमधून चोरी केलेल्या रक्कमेपैकी एकूण १८ लाख रुपये, तसेच गुन्ह्यात वापरलेली ऑटो रिक्षा, आरोपीने परिधान केलेला बुरखा व घरफोडी करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य इत्यादी त्यांच्याकडून हस्तगत करण्यात काशिगाव पोलिसांना यश आले आहे.