भाईंदर, (प्रतिनिधी) प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसोझा, त्याची पत्नी आणि फेम प्रॉडक्शन कंपनीच्या सात जणांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मीरा रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्ही अनबीटेबल डान्स ग्रुपने प्रोडक्शन कंपनीवर 11 कोटी 96 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. रेमो डिसूझा बॉलीवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध कोरिओग्राफर, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये नृत्यदिग्दर्शन केले असून ते बॉलिवूडचे प्रसिद्ध कोरिओग्राफर मानले जातात.
भाईंदर येथील व्ही अनबीटेबल या डान्स ग्रुपची त्याने आणि त्याच्या इतर साथीदारांनी फसवणूक केल्याची तक्रार मीरा रोड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवर कोणतीही कारवाई न झाल्याने डान्स ग्रुपने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेत न्यायालयाने पोलिसांना ४ आठवड्यांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मिरा भाईंदर वसई विरारच्या पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षकांनी तपास करून अहवाल सादर केला. यानंतर मीरारोड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वास्तविक, भाईंदरचा रहिवासी वीर नरोत्तम 2014 मध्ये जैसलपार्क चौपाटीवर डान्स प्रॅक्टिस करताना ओमप्रकाश चौहानला भेटला होता. त्यावेळी चौहान यांनी नरोत्तमच्या डान्सचे कौतुक करत तू चांगला नाचतोस असे म्हटले होते. त्यावेळी चौहानने त्याला सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करून मोठे टीव्ही शो मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. नरोत्तम आणि त्यांच्या डान्स ग्रुपने चौहान यांना त्यांचे व्यवस्थापक बनवले. या ग्रुपमधील सर्व सदस्य 8 ते 20 वयोगटातील असून ते देश-विदेशातील विविध डान्स शोमध्ये सहभागी होत असत. 2018 मध्ये, ग्रुपने ‘डान्स प्लस रिॲलिटी शो’ च्या सीझन 4 मध्ये भाग घेतला, ज्यामध्ये रेमो डिसूझा जज होता. या शोमध्ये, ग्रुपला 5 लाख आणि 1 लाख रुपयांचे व्हाउचर मिळाले होते, परंतु ओमप्रकाश चौहान यांनी ती रक्कम आणि इतर शोचे पैसे ग्रुपमध्ये योग्यरित्या वितरित केले नाहीत.