काशिमीरा, ठाणे (प्रतिनिधी): सकाळच्या वेळेस मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेला लक्ष्य करत गळ्यातील सुमारे अडीच लाखांची सोनसाखळी हिसकावून पसार झालेल्या दोघा चेन स्नॅचर्सना केवळ २४ तासांत गजाआड करण्याची धडाकेबाज कामगिरी गुन्हे शाखा कक्ष १, काशिमीरा पथकाने केली आहे. या चोरट्यांनी महिलेला धक्का देऊन जखमी केले होते.
ही घटना दिनांक ११ एप्रिल रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. आर. एल. कॉलेजच्या मागील सार्वजनिक रस्त्यावर सालासार अवतार बिल्डिंगजवळ फिर्यादी महिला मॉर्निंग वॉक करत असताना, मोटारसायकलवर आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्यातील चार तोळे वजनाची, अंदाजे २.५० लाख रुपये किंमतीची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावली. धक्का दिल्यामुळे फिर्यादीच्या डाव्या हाताला आणि पायाला जखमही झाली. याप्रकरणी मिरारोड पोलीस ठाण्यात भा.दं.सं. (BNS) कलम ३०९(४), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा कक्ष १, काशिमीरा यांनी समांतर तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले. तसेच स्थानिक पातळीवरील गोपनीय माहितीच्या आधारे दोन संशयितांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
तपासात आरोपींची नावे निरज रामू राजनट (२५, रा. लक्ष्मी पार्क, मिरारोड पूर्व) आणि सुनिल संजय राज (२२, रा. रामदेव पार्क, मिरारोड पूर्व) अशी असून, त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. दोघांनाही अटक करून पुढील तपासासाठी मिरारोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त मा. श्री. मधुकर पांडेय, अपर पोलीस आयुक्त मा. श्री. दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) मा. श्री. अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) मा. श्री. मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईमध्ये पोनि. प्रमोद बडाख, पु.नि. उमेश भागवत, पु.नि. संदीप शिंदे, स.फौ. संजय शिंदे, अविनाश गर्जे, संतोष लांडगे, पुष्पेंद्र थापा, स.पो.ह. सुधीर खोत, अश्विन पाटील, पो.शि. प्रशांत विसपुते, गौरव बारी, सौरभ इंगळे, धिरज मेंगाणे, म.सु.ब. किरण आस्वले तसेच सायबर गुन्हे शाखेचे स.फौज. संतोष चव्हाण यांचा सहभाग होता.