सत्य परिचित – मिरारोड (प्रतिनिधी) : मिरा-भाईंदर शहरात सुरक्षित वाहतुकीबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने शहरातील पहिले ट्रॅफिक पार्क मिरा रोड पूर्व येथे सुरू करण्यात आले आहे. २३६५ चौरस मीटर क्षेत्रफळात साकारलेले हे पार्क लहान मुलांना खेळत-शिकण्याचा अनुभव देणारे असून, वाहतूक शिस्तीची बीजं बालपणातच पेरण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे.
२३६५ चौरस मीटर क्षेत्रफळात उभारण्यात आलेल्या या ट्रॅफिक पार्कमध्ये मुलांसाठी प्ले एरिया, कमांडो वाॅल, क्लायमिंग वाॅल, स्विमिंग ब्रिज आणि विविध प्रकारचे टनेल्स उभारण्यात आले आहेत. यासोबतच, विशेषतः ट्रॅफिक सिग्नल, स्पीड लिमिट, गतिरोधक (स्पीड ब्रेकर) आणि हॉस्पिटल परिसरात होर्न वाजवण्यास मनाई करणारे सूचना फलक पार्कच्या विविध ठिकाणी लावण्यात आले आहेत.

हे सर्व मार्गदर्शक फलक आणि रस्त्यांचे प्रत्यक्ष नमुने मुलांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्यासाठी मदत करतात. यामुळे मुलांना रोजच्या आयुष्यात रस्त्यावर कशी काळजी घ्यावी, याची स्पष्ट समज मिळते. शहरातील नागरिकांना वाहतुकीचे प्राथमिक शिक्षण देण्यासाठी आणि वाहतूक शिस्तीबद्दल सकारात्मक संस्कार करण्याच्या उद्देशाने या पार्कची निर्मिती करण्यात आली आहे. लहान वयातच वाहतूक नियमांची ओळख झाली, तर भविष्यात सुरक्षित समाज घडवता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

लहान मुलांबरोबरच त्यांच्या पालकांनाही या पार्कमधील माहिती आणि फलकांद्वारे वाहतूक नियमांची जाणीव करून देण्यात येत आहे. यामुळे संपूर्ण कुटुंबच सुरक्षित वाहतुकीबाबत जागरूक होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

या उपक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेचे सहकार्य लाभले असून, पार्कला स्व. गिल्बर्ट जॉन मेंडोन्सा यांच्या स्मरणार्थ नाव देण्यात आले आहे.
शहरात सुरक्षित वाहतूक संस्कृती निर्माण करण्यासाठी हे ट्रॅफिक पार्क एक महत्त्वाचे पाऊल ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
