स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोफत आरोग्य शिबिर — महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
मिरारोड : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरा भाईंदर शहर जिल्हा पक्षाच्या महिला ब्लॉक अध्यक्षा गौरी उमेश राणे आणि प्रदेश प्रतिनिधी उमेश राणे यांच्या पुढाकाराने मिरा रोड (पूर्व) येथील क्वीन्स पार्क परिसरात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामुळे प्रभागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, महिलांनी व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या शिबिरात मोफत ईसीजी, वजन तपासणी, एचजीटी तपासणी, रक्तदाब तपासणी, डोळ्यांची तपासणी, SPO2 तपासणी, दंत तपासणी तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला यांचा समावेश होता. नागरिकांना सर्व तपासण्या व सल्ला एकाच छताखाली उपलब्ध झाल्याने आरोग्य शिबिराचा मोठा फायदा झाला.
शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेमंडळी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेट देऊन महिला ब्लॉक अध्यक्षा गौरी उमेश राणे आणि प्रदेश प्रतिनिधी उमेश राणे यांनी केलेल्या या उपक्रमाचे अभिनंदन केले. त्यांनी या माध्यमातून प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली असून, अशा प्रकारचे शिबिर पुढेही आयोजित करावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
जिल्हाध्यक्ष प्रमोद कांबळे आणि महिला जिल्हाअध्यक्षा ममता मोराई यांनी शिबिरात उपस्थित राहून राणे दाम्पत्यांचे विशेष कौतुक केले. “गौरी राणे व उमेश राणे हे सातत्याने समाजहितासाठी काम करतात. महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतात,” असे त्यांनी सांगितले.
शिबिरात आलेल्या महिलांनी विशेष आनंद व्यक्त करत महिला ब्लॉक अध्यक्षा गौरी उमेश राणे यांचे मनःपूर्वक आभार मानले. लाडकी बहिण योजना अर्ज भरण्याच्या वेळी त्यांनी दिलेले योग्य मार्गदर्शन महिलांना आर्थिक लाभ वेळेवर मिळवून देण्यात उपयोगी ठरले असल्याचे अनेक महिलांनी सांगितले. याशिवाय महानगरपालिकेच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या मदतीचेही कौतुक करण्यात आले.
कोरोना काळापासूनच उमेश राणे आणि गौरी राणे हे सतत समाजकार्यात सक्रिय राहिले असून, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच सज्ज असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे नागरिक आणि पक्षातील नाते अधिक दृढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.