कांदळवन बफर झोनमध्ये बेकायदा खोदकामाचा धुमाकूळ? नियम धाब्यावर बसवून ठेकेदाराची ‘दिवसाढवळ्या दादागिरी’
भाईंदरमध्ये बफर झोनमध्ये रस्त्याचे वादग्रस्त काम; सीआरझेड व कांदळवन नियमांना हरताळ! परवानगीशिवाय कांदळवनात खोदकाम सुरू असून प्रशासन गप्प, ठेकेदार मात्र बेधडक!
सत्य परिचित – भाईंदर (प्रतिनिधी) 13 डिसेंबर : मिरा-भाईंदर शहरातील भाईंदर पश्चिम येथील नेताजी सुभाष चंद्र बोस मैदानासमोरील रस्त्याच्या कामात गंभीर अनियमितता होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. कांदळवन बफर झोन क्षेत्रात कोणतीही आवश्यक परवानगी न घेता ठेकेदाराकडून दिवसाढवळ्या खोदकाम सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या कामासाठी सीआरझेड, मा. उच्च न्यायालय तसेच कांदळवन विभागाची परवानगी नसतानाही नियमांना केराची टोपली दाखवत काम सुरू असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या कामाच्या नावाखाली कांदळवन बफर झोन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या या भागात कोणतेही काम करण्यापूर्वी संबंधित विभागांची परवानगी आवश्यक असते. मात्र, नियम व कायदे धाब्यावर बसवून ठेकेदाराने अंदाज धुंदपणे काम सुरू ठेवल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, या रस्त्याच्या खोदकामामुळे मूर्धे, राई, मोरवा आणि उत्तन या गावांमधून ये-जा करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता खोदून ठेवण्यात आल्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील गंभीर बनला असून रोजच्या प्रवासात नागरिकांची अक्षरशः घुसमट होत आहे.
याच ठिकाणी रस्त्यालगत मिरा-भाईंदर महानगरपालिकेकडून समाज मंदिराचे बांधकामही सुरू असल्याने परिसरातील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. नागरिकांना चालण्यासाठी देखील जागा उरलेली नसल्याने रोजच्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तरीदेखील संबंधित ठेकेदारावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच महसूल विभाग आणि कांदळवन विभागाकडूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे दिसून येत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात उच्च न्यायालयाच्या आदेशांचे आणि पर्यावरणीय नियमांचे खुलेआम उल्लंघन होत असताना प्रशासन मात्र शांत का? असा सवाल आता स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नियमांचा भंग करून सुरू असलेले हे काम तात्काळ थांबवून संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.