राज्यात अखेर महायुतीचा डंका वाजला, आता मुख्यमंत्री कोण होणार ? याकडे लक्ष!
मुंबई (प्रतिनिधी) : आज जाहीर झालेल्या १५ व्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येणार हे स्पष्ट झाले आहे. महायुतीने २८८ विधानसभा जागांपैकी २३० जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. यामध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) ने १३२ जागांवर, शिवसेना शिंदे गटाने ५७ जागांवर, आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ जागांवर विजय मिळवला आहे. याशिवाय, इतर पाच अपक्ष उमेदवारांनी महायुतीला पाठींबा दिला आहे. या पाठींब्यामुळे महायुतीला २३५ या जादुई आकड्यासह सहज बहुमत मिळवता आले आहे.
तर, महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांना मिळून अपेक्षित कामगिरी करण्यास अपयश आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला २०, काँग्रेसला १६, आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला १० जागा मिळाल्या. यामुळे महाविकास आघाडीला एकत्रितपणे ४६ जागांपर्यंत सीमित राहावे लागले, आणि एकूण ५० जागांचा आकडा गाठता आला नाही.
निवडणुकीच्या निकालानंतर, राज्याच्या मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होईल यावर ताणतणाव निर्माण झाला आहे. युतीतील प्रमुख नेते, विशेषतः विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी विजयाची आनंददायक वातावरणात एकत्र साजरा केला असला तरी, मुख्यमंत्री पदासाठी होणाऱ्या अंतिम निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आकडेवारीनुसार, पक्षनिहाय जिंकलेल्या जागा पुढीलप्रमाणे आहेत:
- भाजप – १३२
- शिवसेना शिंदे गट – ५७
- राष्ट्रवादी काँग्रेस – ४१
- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे – २०
- काँग्रेस – १६
- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट – १०
- समाजवादी पक्ष – २
- सन सुराज्य शक्ती – २
- राष्ट्रीय युवा स्वाभीमान पक्ष – १
- राष्ट्रीय समाज पक्ष – १
- AIMIM – १
- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष – १
- भारतीय शेतकरी आणि कामगार पक्ष – १
- राजर्षी शाहू विकास आघाडी – ०
- अपक्ष – २
तरी, महायुतीने साधलेले यश आणि महाविकास आघाडीची कमकुवत कामगिरी यामुळे पुढील राजकीय रणांगणात कधी कसा निर्णय घेतला जाईल, याकडे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री कोण होणार, या प्रश्नावर सध्या सर्वच राजकीय नेत्यांमध्ये उत्सुकता आहे.