मिरा रोड (प्रतिनिधी) : मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालयात नवीन अत्याधुनिक डायलिसिस युनिटचे उद्घाटन १ मे रोजी, महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधत करण्यात आले. हे लोकार्पण महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मा. राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.) यांच्या हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त प्रसाद शिंगटे, शहर अभियंता दीपक खांबित, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद पडवळ यांच्यासह ‘मेकिंग द डिफरन्स’ संस्थेचे दीपक विश्वकर्मा, पराग पारीख फायनान्शियल ॲडव्हायझरी सर्व्हिसेस (PPFAS) चे शैलेश पांडे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘मेकिंग द डिफरन्स’ आणि PPFAS यांच्या सहकार्याने रुग्णालयात ५ नवीन डायलिसिस मशिन्स उपलब्ध करून देण्यात आल्या असून, यामुळे एकूण डायलिसिस मशिन्सची संख्या १३ झाली आहे. यामुळे डायलिसिस उपचारांची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली असून, गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना अधिक दर्जेदार व वेळेवर सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या प्रसंगी मा. आयुक्तांनी बोलताना, “नवीन युनिटमुळे डायलिसिस रुग्णांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होईल. ही सेवा त्यांच्या कुटुंबासाठीही दिलासादायक ठरेल,” असे सांगितले. त्यांनी दोन्ही संस्थांचे आभार मानत भविष्यातही अशा प्रकारच्या सहकार्याचे आवाहन केले.
मिरा भाईंदर महानगरपालिका आपल्या नागरिकांसाठी आरोग्य सुविधा उंचावण्यासाठी कटिबद्ध असून, हे डायलिसिस युनिट त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.