सुरक्षा उपायांचा अभाव; दहिसरमधील SRA प्रकल्पात १४व्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू, कंत्राटदारासह दोघांवर गुन्हा


सत्य परिचित – मुंबई (प्रतिनिधी) 08 March :
 दहिसर पश्चिम येथील म्हात्रेवाडी परिसरातील साई विभूती SRA प्रकल्पाच्या बांधकाम साईटवर काम करताना १४व्या मजल्यावरून पडून एका मजुराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत कंत्राटदार आणि साईट सुपरवायझरविरुद्ध एमएचबी पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुमताज लाल मोहम्मद (वय ४१) असे मृत मजुराचे नाव असून तो मूळचा बिहार राज्यातील रहिवासी होता. या घटनेप्रकरणी त्याचा भाऊ मोहम्मद तैमुर लाल मोहम्मद (वय ३३) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, दहिसर पश्चिमेतील म्हात्रेवाडी परिसरात साई विभूती SRA प्रकल्पांतर्गत ‘ए’ आणि ‘बी’ असे दोन विंगचे बांधकाम सुरू आहे. या प्रकल्पाचे मुख्य कंत्राट ब्ल्यू ओ रियालिटी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या कंपनीकडे असून त्यांच्या वतीने शिव ऊर्मी कन्स्ट्रक्शनमार्फत काम सुरू आहे.

दरम्यान, बांधकाम साईटवर मजुरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली साधने व सुरक्षा जाळी बसविण्यात आलेली नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. कंत्राटदार विवेक पाटील (३१) हा या प्रकल्पाचे काम पाहत असून मोहम्मद मन्टू (३०) हा साईटवर सुपरवायझर म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.

५ मार्च रोजी दुपारी सुमारे एकच्या सुमारास मुमताज लाल मोहम्मद हे ‘ए’ विंगच्या चौदाव्या मजल्यावर उभे राहून सिमेंट आणि वाळू खाली सोडण्याचे काम करत होते. त्यावेळी ते उघड्या डक्टजवळ उभे होते. मात्र त्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा जाळी किंवा संरक्षणात्मक साहित्य बसविण्यात आलेले नव्हते. त्यामुळे काम करताना त्यांचा तोल जाऊन ते थेट चौदाव्या मजल्यावरून खाली कोसळले.

या भीषण अपघातात त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने दहिसर पूर्व येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना कांदिवली पश्चिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

या घटनेनंतर बांधकाम साईटवरील सुरक्षेच्या नियमांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मजुरांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत एमएचबी पोलिसांनी कंत्राटदार विवेक पाटील आणि साईट सुपरवायझर मोहम्मद मन्टू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मराठी बातम्या | मुंबईत कलम 144 अन्वये 18 जानेवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू | Marathi Batmya

मराठी बातम्या | Marathi Batmya Prohibitory orders under section 144 imposed in…