काशीमिरा स्मशानभूमीतील समस्यांवर मनसेची यशस्वी लढाई
भाईंदर: काशीमिरा येथील स्मशानभूमीतील कामगारांच्या अभावामुळे अंत्यविधी प्रक्रियेत होणाऱ्या विलंबाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उघड केलेल्या गंभीर समस्येचा अखेर मीरा-भाईंदर महानगरपालिकेने निपटारा केला आहे.
दिनांक ७ डिसेंबर २०२४ रोजी मनसे मिरा भाईंदर शहराचे विभानसभा अध्यक्ष सचिन पोपळे हे आपल्या नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी काशिमिरा स्मशानभूमीत गेले असता, तेथील स्थिती त्यांनी स्वतः अनुभवली. पावती दिल्यानंतरही सायंकाळी ७.३० पासून रात्री ९ वाजेपर्यंत स्मशानात एकच कामगार असल्यामुळे अंत्यविधीसाठी लागणारे लाकूड व्यवस्थित लावले गेले नव्हते. त्यामुळे नातेवाईकांना स्वतःच्या हातांनी काम करावे लागल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित केला गेला.
सचिन पोपळे म्हणाले, “पालिकेने जर ठेकेदाराला जबाबदारी दिली आहे, तर त्याने पुरेसे कामगार ठेवणे अपेक्षित आहे. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना लाकडे आणून स्मशानभूमीतील काम करावे लागत असेल, तर यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट दुसरी कोणतीच असू शकत नाही.”
हेही वाचा: मनपा कामगार कर्मचारी सेना अध्यक्षपदी अभिनंदन चव्हाण यांची नियुक्ती
स्मशानभूमीत असलेल्या वाहनांची चाके नादुरुस्त असून, स्मशानाच्या व्यवस्थापनात होत असलेल्या ढिसाळपणावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या समस्येचा त्वरित निपटारा करण्यासाठी मनसेने महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयात प्रतिकात्मक तिरडी घेऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
मनसेच्या इशाऱ्यामुळे महानगरपालिका खडबडून जागी झाली. दिनांक ११ डिसेंबर २०२४ रोजी मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे उपायुक्त सचिन बांगर यांनी मनसेचे सचिन पोकळे यांना पत्र दिले. या पत्रात स्मशानभूमीत अतिरिक्त कामगार नियुक्त करणार असल्याचे तसेच स्मशानात स्वच्छतेची उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले.
मनसेच्या मागणीमुळे काशिमिरा स्मशानभूमीत सुधारणा होणार असून, यामुळे अंत्यविधी प्रक्रियेस येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.