सत्य परिचित – नवी मुंबई (प्रतिनिधी) 10 डिसेंबर : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या दीर्घकालीन मागणीला आता प्रत्यक्ष गती मिळू लागली आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री श्री. मुरलीधर मोहोळ यांची नवी दिल्लीमध्ये विशेष भेट घेऊन हा मुद्दा पुन्हा ठळकपणे मांडला. या चर्चेत राज्यमंत्री मोहोळ यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच सन्मानपूर्वक निर्णय होईल असे स्पष्ट संकेत दिले.
नवी मुंबईतील भूमिपुत्र अनेक वर्षांपासून या मागणीसाठी सातत्याने आंदोलन व पाठपुरावा करत आहेत. राज्य आणि केंद्रस्तरावर अनेकदा आश्वासने मिळूनही अंतिम निर्णय होत नसल्याने नाराजी होती. मात्र आजच्या बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे या संघर्षाला नवा ‘वेग’ मिळाल्याची भावना स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे.
खासदार बाळ्या मामा म्हणाले—
“भूमिपुत्रांच्या भावना अतिशय जिव्हाळ्याच्या आहेत. आम्ही शांततेने आणि सन्मानाने ही लढाई लढत आहोत. येत्या शुक्रवारी मी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मा. किंजरापु राममोहन नायडू साहेबांची भेट घेऊन दि. बा. पाटील साहेबांच्या योगदानाची जाणीव करून देत ही मागणी पूर्ण करण्याची विनंती करणार आहे.”
ही बातमी पण वाचा : वर्षानुवर्षे खड्डे, पण निवडणुकीच्या आधीच ‘विकासाची’ लगबग व ‘डांबरी मेकओव्हर’—पनवेलमध्ये नागरिकांचा सवाल
खासदार बाळ्या मामा यांनी सातत्याने घेतलेल्या भूमिका आणि ठाम पाठिंब्यामुळे या नावकरणाच्या निर्णयाची शक्यता आता पूर्वीपेक्षा अधिक स्पष्ट होत आहे. स्थानिकांमध्ये उत्साह आणि आशावाद वाढत असून लवकरच अपेक्षित घोषणा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
शेतकरी, सहकार आणि ग्रामीण विकास क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण झाले, तर महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला मोठा सन्मान मिळेल—अशी भावना राज्यभरातून व्यक्त केली जात आहे.
भूमिपुत्रांच्या हक्कासाठी सतत धडपडणाऱ्या खासदार बाळ्या मामा यांच्या पुढाकारामुळे नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा मार्ग आता प्रत्यक्षात खुला होत असून, महाराष्ट्र एका मोठ्या ऐतिहासिक निर्णयाच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचे संकेत मिळत आहेत.