नवी मुंबई डान्स बार प्रकरण : स्वतंत्र पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी!
परदेशी क्रमांकावरून कॉल – “तुझ्या जीवाला धोका आहे” असा आरोप**
सत्य परिचित – नवी मुंबई (प्रतिनिधी) 08 डिसेंबर : नेरुळ येथील बेकायदेशीर ‘सोना लेडीज डान्स बार’ संदर्भातील धक्कादायक तपशील उघड करत असलेल्या एका स्वतंत्र पत्रकार–व्हिसलब्लोअरने स्वतःला गंभीर जीविताचा धोका असल्याचा आरोप केला आहे. संबंधित पत्रकाराच्या म्हणण्यानुसार, आज सकाळी त्याला “+1” (USA) देशकोड असलेल्या परदेशी क्रमांकावरून फोन आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला “पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी” म्हणून ओळख दिली आणि थेट जीवघेणी धमकी दिल्याचा दावा त्या पत्रकाराने केला आहे.
कॉलरने कथितरित्या मराठीत बोलत —
“डान्स बारच्या बातम्या बंद कर… तुझ्या कुटुंबाला काय होईल सांगू शकत नाही. उद्या रात्री ११ वाजता नेरूळ पोलीस स्टेशनजवळ एकट्याने ये. सेटलमेंट करू. कोणाला सांगितलंस तर परिणाम भयंकर होतील.”
असे सांगितल्याचा आरोप पत्रकाराने केला.
पत्रकाराने सांगितले की, कॉल परदेशातून आल्याचे दिसत असले तरी आवाज, शब्दप्रयोग आणि बोलण्याची शैली पाहता हा फोन नंबर स्पूफिंग करून केलेला असण्याची शक्यता जास्त वाटते. “तुझी फाईल आमच्याकडे आहे” अशा वाक्यांचा वापर केल्यामुळे कॉल करणारा व्यक्ती पोलिस खात्यातील असू शकतो, असा संशय उपस्थित करण्यात आला आहे.
बातमीची पार्श्वभूमी – बारमधील अश्लील नृत्याचे व्हिडिओ उघड केल्यानंतर धमक्या?
काही दिवसांपूर्वी त्याच पत्रकाराने ‘सत्य परिचय’ या न्यूज चॅनलला नेरूळमधील काही बारमध्ये सुरू असलेल्या अवैध डान्स बार, अश्लील नृत्य, अवैध मद्यविक्री आणि बंदी असूनही सुरू असलेल्या शोचे व्हिडिओ दिल्याचे समोर आले आहे. हे व्हिडिओ चॅनलवर प्रसारित झाल्यानंतरच पत्रकाराला धमकीचे फोन कॉल आणि मेसेजेस येत असल्याचा गंभीर आरोप त्याने केला आहे.
पत्रकाराचा आरोप – दावा नाही, पोलिस तपास आवश्यक
या संपूर्ण प्रकरणात पत्रकाराच्या बाजूने धमकी मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी निष्पक्ष तपास करणे अत्यावश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात येत आहे.
कारण —
स्वतःला पोलीस अधिकारी सांगणारा व्यक्ती नेमका कोण?
परदेशी क्रमांकावरून कॉल आला की नंबर स्पूफिंग?
पत्रकाराला धमकी दिली का?
याचा उलगडा करणे आवश्यक असल्याचे नागरिक व तज्ज्ञांचे मत आहे.
यामुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलिन होत असून, तपास लवकरात लवकर व्हावा, अशी मागणीही होत आहे.
—
तक्रार दाखल – पण ‘धमकी देणारा पोलीस खात्यातलाच असेल तर?’
पत्रकाराने सायबर सेल तसेच नवी मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेकडे ईमेलद्वारे तक्रार दिली आहे. मात्र, जर धमकी देणारा खरोखरच पोलीस यंत्रणेतलाच असेल, तर तक्रार कोणाकडे करायची, हा मूलभूत प्रश्नही पुन्हा एकदा समोर आला आहे.
या घटनेमुळे पत्रकार सुरक्षा, प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य आणि अवैध बारवर सुरू असलेल्या कारवाईच्या मुद्द्यावर मोठी खळबळ उडाली आहे.