सत्य परिचित – मिरारोड (प्रतिनिधी) :  मिरा-भाईंदर महानगरपालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक प्रभागात अतिक्रमण निर्मूलन पथके नेमली आहेत. नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या पथकांकडून त्वरित तपासणी करून कारवाई करणे अपेक्षित आहे. या कारवाईमध्ये इमारती पाडणे, दंडात्मक शुल्क वसूल करणे तसेच दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करणे यांचा समावेश होतो.

मात्र वास्तव पाहता प्रभाग समिती क्रमांक ४ मध्ये परिस्थिती पूर्णतः वेगळी आहे. येथे अनधिकृत बांधकामे राजेरोसपणे सुरू असून या बांधकामांमुळे महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडीत गेला आहे. याचसोबत सामान्य गृहखरेदीदारांची फसवणूक होत असून वाढत्या अनधिकृत बांधकामांमुळे शहरातील पाणी, रस्ते, वीज, ड्रेनेज आणि इतर मूलभूत सुविधांवर ताण निर्माण झाला आहे. परिणामी करदात्या नागरिकांमध्ये संताप उसळला आहे.

या गंभीर परिस्थितीत देखील प्रभाग समिती क्र. ४ मधील लिपिक आणि प्रभाग अधिकारी यांच्या संगनमताची चर्चा शहरात जोर धरत आहे. काही दिवसांपूर्वी एका साप्ताहिकात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, प्रभाग ४ मध्ये अनेक वर्षांपासून एकाच पदावर कार्यरत असलेल्या लिपिकाचा प्रभाव इतका वाढला आहे की, प्रभाग समिती कार्यालयाच्या काही मीटर अंतरावर उभ्या केलेल्या अनधिकृत बांधकामालाही त्याचेच संरक्षण मिळत असल्याचे बोलले जाते.

घोडबंदर गावातील कांदळवन क्षेत्रात माती भराव करून उभारण्यात आलेल्या स्टुडिओंनाही या लिपिक व प्रभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांचे छत्रछाया लाभल्याची चर्चा सुरू आहे. या ठिकाणी अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. नागरिकांकडून वारंवार तक्रारी करण्यात येऊनही प्रशासनाकडून ठोस पाऊल उचलले जात नसल्याने पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, विनय नगर व नया नगर परिसरातील अनधिकृत बांधकामांविरोधातही अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. परंतु प्रभाग अधिकारी स्वप्नील सांवत यांनी त्या तक्रारींवर तब्बल तीन ते चार महिन्यांनी कारवाई केल्याचे समोर आले आहे. या विलंबामुळे बांधकाम करणाऱ्यांना बेकायदेशीर बांधकाम पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाल्याची चर्चा आहे.

प्रभाग क्षेत्रातील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवणे व आवश्यक कायदेशीर कारवाई करणे हे प्रभाग अधिकाऱ्यांच्या कर्तव्यसूचीत स्पष्टपणे नमूद असूनही, प्रभाग अधिकारी स्वप्नील सांवत यांच्या कामचुकारपणामुळे आणि लिपिकांच्या दबदब्यामुळे प्रभाग ४ मध्ये अनधिकृत बांधकामांचा फैलाव होत असल्याचा नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

शिवक्रांती प्रतिष्ठान संस्थेतर्फे भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्यदिव्य मंदिर

छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील पहिले भव्यदिव्य मंदिर, भिवंडीतील मराडे पाडा या ठिकाणी…