भाईंदर, दि. १२ जुलै, (प्रतिनिधी : निरंजन नवले) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून मीरा-भाईंदर शहराच्या विविध विकास कामांबाबत विधान भवनात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एमएमआरडीएकडून प्रामुख्याने मीरा-भाईंदर शहरातील विविध विकासकामांसाठी करण्यात येत असलेल्या विकासकामांचाही समावेश होता.
बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हाडाची घरे महापालिका प्रशासनाला हस्तांतरित करण्याच्या सूचना दिल्या. यासोबतच मीरा-भाईंदर पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पुलाच्या कामाला गती देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. राइ -मोरवा गावापर्यंत 18 मीटर ऐवजी 30 मीटर रुंद रस्ता तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पीपीपी पद्धतीने बीएसयूपी प्रकल्प राबविण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक संजय काटकर यांना दिल्या. या बैठकीत शासनाकडून सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीतून सुरू असलेली विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच आमदार प्रताप सरनाईक यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. आमदार प्रताप सरनाईक म्हणाले की, मीरा भाईंदर शहराच्या विकासकामांना मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे.
हे हि वाचा : मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील शौचालय दुरुस्तीच्या कामाची ६ महिन्यांपासून रखडपट्टी
आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांना यश आले
या बैठकीत सरनाईक यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन त्यास गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बैठक पूर्णपणे सकारात्मक झाली. या बैठकीत सरनाईक यांनी 218 एमएलडी पाण्याच्या उपलब्धतेचा मुद्दाही उपस्थित केला. मीरा-भाईंदरला सूर्या धरणातून लवकरात लवकर पाणी देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, अपर प्रधान सचिव आय एस चहल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक संजय काटकर, जलसंपदा सचिव संजय बेलभरे, डॉ. जतुन कपोले, उदय ढगे, क्लेमेंट बेन, जी मल्लिकार्जुन, मीरा-भाईंदर महापालिकेचे शहर अभियंता दीपक खांबित, उदय मराठे, अनिल अंकलगी, अजित कवडे, विनोद पवार, संजय कदम, अतुल कुलकर्णी, पी.एम.शिंद आदी उपस्थित होते.