मनपाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून बोगस डॉक्टरला संरक्षण?
माजी नगरसेविका शर्मिला बगाजी यांचा गंभीर आरोप; नागरिकांमध्ये संतापाची लाट
सत्य परिचित – भाईंदर (प्रतिनिधी) : विना नोंदणी आणि विनापरवाना ऍलोपॅथी वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. फैयाज आलम यांना मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद पडवळ यांनी संरक्षण दिल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणी पालिकेला लेखी पत्र देत संबंधित अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंग व कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
बगाजी यांच्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, १ सप्टेंबर २०२५ रोजी उत्तन परिसरात ग्लॅस्टन घोन्साल्विस (वय २०) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यावेळी उपचार करणारे डॉक्टर फैयाज आलम हे बिननोंदणीकृत आणि विनापरवाना असल्याचे उघड झाले. त्यांच्या ‘उत्तन चारिटेबल क्लिनिक’ आणि संबंधित ‘सारा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’ या दोन्ही ठिकाणी वैद्यकीय सेवा महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी नियम, २०२१ चे उल्लंघन करत दिल्या जात असल्याचे अहवालात नमूद आहे.

अधिकाऱ्यांकडून कारवाईला टाळाटाळ
उत्तर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक पाडवी यांनी २० ऑगस्ट २०२५ रोजी सादर केलेल्या अहवालात सारा हॉस्पिटल मार्चपासूनच बिननोंदणीकृत असल्याचे स्पष्ट केले होते. तरीदेखील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद पडवळ यांनी तत्काळ कारवाई न करता या हॉस्पिटल व डॉक्टरला संरक्षण दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
३ सप्टेंबर रोजी फक्त सारा हॉस्पिटलविरुद्ध कारवाईचे आदेश देण्यात आले, परंतु ‘उत्तन चारिटेबल क्लिनिक’ आणि डॉक्टर आलम यांच्या विरोधात कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये संताप उसळला असून, प्रशासनाच्या निष्काळजी वृत्तीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मृत्यू प्रकरणानंतरही गुन्हा दाखल नाही
ग्लॅस्टन गोन्साल्विसच्या मृत्यूनंतर उत्तन सागरी पोलिसांनी ६ सप्टेंबर रोजी क्लिनिक सील केले असले तरी, डॉ. आलम यांच्याविरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. बगाजी यांनी पत्रात नमूद केले आहे की,
“मृत्यूनंतरही फक्त दवाखाना आणि हॉस्पिटल लोकांच्या दबावाखाली बंद करण्यात आले. मात्र, आजवर डॉ. आलम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. म्हणजेच मनपा अधिकारी अशा बोगस डॉक्टरांना संरक्षण देत आहेत.”
बोगस डॉक्टर शोध मोहिम’ला हरताळ?
राज्य शासनाने सुरू केलेल्या “बोगस डॉक्टर शोध मोहिमे”चे खुलेआम उल्लंघन महानगरपालिकेकडून होत असल्याचेही बगाजी यांनी निदर्शनास आणले आहे. डॉ. प्रमोद पडवळ यांनी कर्तव्यात निष्काळजीपणा आणि कर्तव्य कसूर दाखवून अशा डॉक्टरांना संरक्षण दिल्याचे पुरावे समोर आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या संपूर्ण प्रकरणात नागरिक आणि सामाजिक संघटनांनी डॉ. प्रमोद पडवळ यांच्या विरोधात शिस्तभंग व विभागीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, बिननोंदणी वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. फैयाज आलम यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.