भाईंदर : बांगलादेशातील हिंदू नागरिकांवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात आंदोलन
बांगलादेशातील हिंदू, बौद्ध, आणि जैन अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ले, हत्या आणि अत्याचार याच्या निषेधार्थ आज भाईंदर पूर्वेतील गोल्डन नेस्ट सर्कल येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला मीरा-भाईंदर शहरातील मोठ्या प्रमाणावर हिंदू बांधवांनी पाठिंबा दर्शवला.
बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अन्यायामुळे त्यांची मंदिरे आणि घरे जाळली जात असून, त्यांना मोठ्या प्रमाणावर हिंसाचाराचा सामना करावा लागत आहे. यासाठी तेथील राज्यकर्ते जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मागील काही काळात अशा अनेक घटनांची नोंद झाली आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावरही चिंता व्यक्त होत आहे.
बांगलादेशातील हे संकट 1972 साली त्यांच्या स्वातंत्र्यानंतर सुरू झालेल्या धोरणांशी जोडले गेले आहे. स्वातंत्र्यसैनिकांच्या वंशजांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये दिलेले 30 टक्के आरक्षण सध्या सुरू असलेल्या हिंसाचाराचे एक प्रमुख कारण मानले जात आहे.
राजकीय हालचालींमुळे देशातील परिस्थिती अधिकच बिघडली आहे. हिंसक आंदोलनांमुळे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडण्यास भाग पाडले गेले आहे. सध्या लष्कराने सत्ता ताब्यात घेतली असून त्यांनी आंदोलनकर्त्यांना शांततेचे आवाहन केले आहे.