मिरा-भाईंदर महानगरपालिकेत मराठी भाषिक महापौर नेमण्याच्या मागणीसाठी दोन महिन्यांपूर्वी झालेल्या आंदोलन प्रकरणात आता भाईंदर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून, यामुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
माहितीनुसार, जानेवारीमध्ये झालेल्या मनपा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले होते. त्यानंतर महापौर पदासाठी डिंपल मेहता यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मात्र त्या मराठी भाषिक नसल्यामुळे मराठी एकीकरण समितीने याला विरोध दर्शविला होता.
३ फेब्रुवारी रोजी या निर्णयाविरोधात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात मराठी एकीकरण समितीसोबतच मनसेचे काही पदाधिकारीही सहभागी झाले होते. पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही आंदोलनकर्ते भाईंदर पश्चिम येथील सुभाषचंद्र बोस मैदानाजवळ एकत्र जमले आणि घोषणाबाजी, ढोल-ताशे व निदर्शनांद्वारे आपला विरोध व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी मनपा मुख्यालयाकडे जाण्याचाही प्रयत्न केला.

आता सुमारे दोन महिन्यांनंतर या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम १३५, कलम ३७(१)(क) तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख, प्रमोद पोर्टे, कृष्ण हरिबा जाधव यांच्यासह मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे आणि महिला पदाधिकारी रेश्मा तपासे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दोन महिन्यांनंतर अचानक झालेल्या या कारवाईमुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. मराठी भाषा आणि हक्कांसाठी आवाज उठवणेही आता गुन्हा मानला जात असल्याची भावना आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.