सत्य परिचित – नवी मुंबई (प्रतिनिधी), 05 डिसेंबर : वाशी सेक्टर-११, जुहूगाव येथे ‘आरपणा सलून अँड स्पा’च्या आडून चालणाऱ्या जबरदस्तीच्या देहव्यापाराच्या अड्ड्याचा पर्दाफाश नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTU) केला. रविवारी (ता. ३० नोव्हेंबर) दुपारी केलेल्या धाडसात सहा पीडित महिलांची सुटका करण्यात आली, तर स्पाची मॅनेजर आसिमा घोष (वय ३४) याला अटक केली गेली. तिचा मुख्य साथीदार नूर शेख मात्र पोलिसांना चकमा देऊन फरार झाला आहे.गुप्त माहितीवरून बनावट ग्राहक पाठवल्यानंतर स्पात चाललेले विदारक चित्र समोर आले. बाहेरून सामान्य मसाज पार्लर दिसणाऱ्या या ठिकाणी गरीब व गरजू महिलांना नोकरीचे आमिष दाखवून आणले जात होते आणि नंतर धमकी, मारहाण आणि ब्लॅकमेल करून त्यांना देहव्यापाराला भाग पाडले जात होते. पीडितांमध्ये काही महिलांचे वय २० ते २५ वर्षांच्या आसपास असल्याचे समजते.वाशी पोलिस ठाण्यात बी.एन.एस. कलम १४३(३), ३(७) तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९७६ ची कलम ३, ४, ७ व ७(१) अशी गुन्हे दाखल करण्यात आली आहेत. न्यायालयाने आसिमा घोषला ४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून फरार नूर शेखच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.नवी मुंबईसारख्या आधुनिक शहरात, अगदी पोलिस ठाण्यापासून काही मिनिटांच्या अंतरावर असे मानवी तस्करीचे अड्डे बिनधास्त चालू असतील, तर सामान्य महिलांची सुरक्षितता किती धोक्यात आहे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही महिन्यांत नवी मुंबईत अशा धाडसांमध्ये सुटका झालेल्या पीडितांची संख्या आता दहा पार झाली आहे.पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा स्पा-सेंटरमध्ये नोकरी किंवा ‘हाय पॅकेज’च्या आमिषाला बळी पडू नये आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित १०० किंवा AHTU हेल्पलाइनवर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मराठवाड्यावर अवकाळी संकट: १७ दिवसांच्या वादळी पावसात २७ जणांचा मृत्यू, शेतीचं मोठं नुकसान

मराठवाड्यावर अवकाळी संकट: १७ दिवसांच्या वादळी पावसात २७ जणांचा मृत्यू, शेतीचं मोठं…