ठाणे, दि. १५ डिसेंबर : जुन्या पेन्शनसाठी ठाणे जिल्ह्यातील सरकारी- निमसरकारी कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी आजपासून सुरू झालेल्या राज्य स्तरीय बेमुदत संपात सहभागी झाले. ठाण्याच्या जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालयात बेमुदत संपामुळे शुकशुकाट पाहायला मिळाला. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेल्या संपात शेकडोंच्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे याचा परिणाम शासकीय सेवेवर झाला असून, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासह, जिल्हा परिषद कार्यालय, तहसील कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसून आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याबाबत सरकारने सकारात्मक भूमिका न घेतल्यामुळे व कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्याने राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. ठाणे व पालघर जिल्ह्यातील महसूल विभागासह अनेक विभागाच्या सर्व तालुका, जिल्हास्तरीय कार्यालयात कोणीही कर्मचारी, अधिकारी उपस्थित नव्हते. मात्र या सर्वांमुळे सामान्य नागरिक आपल्या कामानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय व सेतू कार्यालयात आले होते त्यांना मात्र दीर्घवेळ प्रतीक्षा करूनही घरी परतावे लागले.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, ठाणे जिल्हा आदी विविध संघटनांनी जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसह अन्य प्रलंबित मागण्या सरकार पर्यंत पोहचावे याकरिता सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काल पासून बेमुदत संप पुकारला आहे.
राज्य पातळीवरील या बेमुदत संपात सहभागी होण्यासाठी या कर्मचाऱ्यांच्या राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे मुख्यमंत्र्यांसाठी निवेदन देऊन त्यात बेमुदत संपाचा इशारा दिला होता.
जुनी पेन्शन योजना पदरात पाडून घेण्यासह प्रलंबित सर्व मागण्या मंजूर केल्याशिवाय हा राज्यस्तरीय बेमुदत संप मागे घेणार नसल्याचे या कर्मचाऱ्यांनी निर्धार करून ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शासना विरोधात हाता मध्ये पोस्टर घेऊन आंदोलन केले. जर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर येत्या सोमवार (ता. १८ डिसेंबर )पासून शिक्षक चक्रीय बेमुदत उपोषणाला सुरवात करतील व त्यानंतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे या संघटनेचे अध्यक्ष गणेश प्रधान यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.