सत्य परिचित – भाईंदर (प्रतिनिधी), २८ ऑक्टोबर : मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ६ कार्यक्षेत्रात अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे आणि फेरीवाल्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. महानगरपालिकेच्या आदेशानुसार या प्रभागात अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवणे, धोकादायक इमारतींची तपासणी, तसेच अतिक्रमणांवर कारवाई करणे हे जबाबदारीचे काम असले तरी प्रत्यक्षात या सर्व जबाबदाऱ्या केवळ कागदावरच मर्यादित राहिल्याचे चित्र दिसत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, प्रभाग अधिकारी प्रियांका भोसले यांना इतर कामकाज सोपवल्याने त्या प्रभागात फारशा फिरकताना दिसत नाहीत. परिणामी, प्रभागातील कामकाज आता महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयातूनच चालते. नागरिकांच्या तक्रारीनुसार, “प्रभाग अधिकारी वेळ मिळाला तरच प्रभागात येतात, त्यामुळे स्थानिक तक्रारींचे निवारण प्रभावीपणे होत नाही,” अशी खंत व्यक्त केली जात आहे.

याच काळात, काशीमिरा परिसरातील मांडवी पाडा येथे महाराष्ट्र बेकरीलगत परवानगीशिवाय व महसूल न भरता उभारलेले अनधिकृत बांधकाम चर्चेचा विषय ठरले आहे. प्रभाग कार्यालय क्र. ६ च्या वतीने ३ ऑक्टोबर २०२५ रोजी कारवाई करण्यात आली होती, मात्र ती केवळ थातूरमातूर ठरली. कारण, संपूर्ण बांधकाम पाडले गेले नसल्याने काही दिवसांतच बांधकाम धारकाने पुन्हा त्याच ठिकाणी नव्याने बांधकाम उभारले आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, “कारवाई थांबली की बांधकाम सुरु होतं, बांधकाम थांबलं की कारवाई सुरु होते, आणि दोन्हींत फायदा कोणाचा – हे सगळ्यांना माहिती आहे,” अशी चर्चा परिसरात रंगली आहे.

तसेच, प्रभागात नेमलेले अभियंता देखील अनेक महिन्यांपासून अनुपस्थित आहेत, तर कामकाज केवळ काही लिपिक आणि बांधकाम तोडणारे कर्मचारी यांच्या भरोशावर सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. परिणामी, अधिकृत देखरेखीअभावी अनधिकृत बांधकामांना अक्षरशः ‘मोकळे रान’ मिळाले आहे.

दरम्यान, नागरिकांमध्ये चर्चा आहे की, “प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर काहींचा वरदहस्त आहे, आणि त्यातून मिळणारा मलिदा योग्य ठिकाणी पोहोचतो, त्यामुळेच कारवाईत ढिलाई दाखवली जाते,” असा आरोपही नागरिकांमध्ये ऐकू येतो.

प्रभाग क्र. ६ मधील वाढती अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे आणि फेरीवाल्यांची वाढती संख्या पाहता नागरिकांचा प्रश्न आता गंभीर आहे —
महानगरपालिका कारवाई करणार, की पुन्हा एकदा फक्त नोटिसा देऊन जबाबदारी टाळणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

शिवक्रांती प्रतिष्ठान संस्थेतर्फे भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्यदिव्य मंदिर

छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील पहिले भव्यदिव्य मंदिर, भिवंडीतील मराडे पाडा या ठिकाणी…