भाईंदरमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ८ नराधम गजाआड!
सत्य परिचित – भाईंदर (प्रतिनिधी) १९ जून : भाईंदर पूर्व भागातील नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीची खरेदी-विक्री करून तिला देहव्यापारात ढकलणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी नवघर पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह एकूण ८ आरोपींना अटक केली असून, संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ६१ वर्षांच्या एका व्यक्तीने या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यासाठी तिला ५० हजार रुपयांना विकत घेतल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.
शिक्षणाचे आमिष दाखवून आणले आणि फसवणूक केली
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मार्च २०२६ मध्ये नवघर पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. एका सुरक्षा रक्षकानेच ही मुलगी बेपत्ता असल्याचा बनाव रचला होता. पोलिसांनी तात्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी जेव्हा या मुलीचा शोध घेतला, तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आले. पीडित मुलगी मूळची हरियाणाची असून तिची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. आरोपीने ‘मुलीला चांगल्या शाळेत घालतो आणि तिची काळजी घेतो’ असे खोटे आश्वासन तिच्या आईला दिले होते आणि तिला भाईंदर येथे आणले होते. मात्र, येथे आणल्यानंतर आरोपी दाम्पत्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तिला या दलदलीत ढकलले.
मोबाईलमधील स्क्रीनशॉटमुळे फुटले बिंग
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास करत संशयित दाम्पत्याला ताब्यात घेतले. मुख्य महिला आरोपीचा मोबाईल जप्त करून तपासला असता, त्यात अनेक महिलांचे फोटो आणि पैशांच्या व्यवहाराचे स्क्रीनशॉट्स आढळून आले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, हे दाम्पत्य राहत्या घरीच अनैतिक व्यापार चालवत असल्याचे उघड झाले.
या रॅकेटमध्ये अन्य काही महिला आणि पुरुषांचाही समावेश होता, ज्यांनी पीडित मुलीला जबरदस्तीने या व्यवसायात ओढले. पीडित मुलीला डोंबिवली परिसरासह इतर ठिकाणीही ग्राहकांकडे लैंगिक अत्याचारासाठी पुरवण्यात आले होते. तसेच आरोपींच्या घरी येणाऱ्या अन्य नराधमांनीही तिच्यावर अत्याचार केले होते.
५० हजारांत सौदा आणि मुख्य आरोपीला बेड्या
या संपूर्ण प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ६१ वर्षीय मुख्य आरोपीने पीडित मुलीवर अत्याचार करण्याच्या उद्देशाने तिला या दाम्पत्याकडून ५०,००० रुपयांना विकत घेतले होते. त्याने मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. या अमानुष छळाला कंटाळून अखेर संधी मिळताच पीडित मुलगी तिथून पळून गेली होती.
घटनेनंतर मुख्य आरोपी उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे पळून गेला होता. नवघर पोलिसांचे पथक तेथे पोहोचले असता, पोलिसांची चाहूल लागताच तो पुन्हा मुंबईच्या दिशेने पळाला. मात्र, पोलिसांनी चिकाटी न सोडता मालाड ते भाईंदर दरम्यान सापळा रचून त्याला अटक केली.
पोलीस प्रशासनाची कौतुकास्पद कामगिरी
नवघर पोलिसांनी अत्यंत तत्परतेने तपास करत या अनैतिक मानवी वाहतूक (Human Trafficking) आणि सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. आतापर्यंत या गुन्ह्यात एकूण ८ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS), पोक्सो (POCSO), अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम (PITA) आणि बाल न्याय कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही धडक कारवाई पोलीस उप आयुक्त राहुल चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद यादव, सपोनि राम सुरवसे, पोउपनि संपत आहेर, पोउपनि आदक आणि त्यांच्या पथकाने पार पाडली आहे.