सत्य परिचित – भाईंदर (प्रतिनिधी) : २८ ऑक्टोबर, उत्तन समुद्रकिनारी मासेमारी करत असताना एका मच्छीमाराचा हात ईल (वाम) माशाच्या चाव्याने गंभीर जखमी झाला. हात कापण्याची वेळ येऊन ठेपली असतानाच मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करून त्याचा हात वाचवला — आणि जीवघेण्या परिस्थितीवर विजय मिळवला.

४२ वर्षीय संदीप भोईर (नाव बदललेले) गेली अनेक वर्षे भायंदरमधील उत्तन बीचवरील खडकाळ किनाऱ्यावर मासेमारी करत असतात. रोजप्रमाणेच एका दिवशी मासे हाताळताना त्यांच्या हातातून ईल मासा निसटला आणि त्याने त्यांच्या डाव्या मनगटावर दोनदा चावा घेतला. त्या चाव्यामुळे खोल जखमा, तीव्र रक्तस्राव आणि काही तासांतच हातात प्रचंड सूज आली.

सहकाऱ्यांनी तत्काळ पट्टी बांधून रक्त थांबवण्याचा प्रयत्न केला, पण स्थानिक उपचार निष्फळ ठरले. तब्बल १७ तासांनंतर संदीप यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयात पोहोचल्यावर त्यांचा हात सुजलेला, फिकट आणि रक्तप्रवाह पूर्णपणे थांबलेला होता. संवेदना हरवल्या होत्या आणि तीव्र वेदना होत होत्या. तपासणीत ॲक्युट कम्पार्टमेंट सिंड्रोम (Acute Compartment Syndrome) असल्याचे स्पष्ट झाले — ही अशी स्थिती ज्यामध्ये सूजेमुळे स्नायूंमधील रक्तपुरवठा थांबतो आणि हात कायमचा निकामी होऊ शकतो.

तत्काळ शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. डॉ. सुशील नेहेते (प्लास्टिक, हँड आणि रिकन्स्ट्रक्टिव मायक्रोसर्जन) यांनी डॉ. प्रीती दीक्षित यांच्या मदतीने आपत्कालीन शस्त्रक्रिया केली. या प्रक्रियेत फॅसिओटोमी (Fasciotomy) करण्यात आली — म्हणजे स्नायूंवरील दाब कमी करून रक्तप्रवाह पुन्हा सुरू करण्यात आला.

डॉ. नेहेते म्हणाले,

“रुग्ण आमच्याकडे आला तेव्हा त्याच्या हातातील रक्तप्रवाह पूर्ण थांबला होता. आणखी काही तासांचा उशीर झाला असता, तर हात कापण्याशिवाय पर्याय राहिला नसता. वेळेवर केलेल्या शस्त्रक्रियेने आम्ही हाताचा रक्तप्रवाह पुन्हा सुरू केला.”

शस्त्रक्रियेनंतर मात्र आणखी एक धोका निर्माण झाला — रक्तप्रवाह पुन्हा सुरू झाल्याने स्नायूंमधील विषारी द्रव्ये रक्तात मिसळली आणि किडनी फेल्युअरचा धोका निर्माण झाला. पण वोक्हार्टच्या आयसीयू टीमच्या दक्षतेमुळे तो संकटातूनही ते सुखरूप बाहेर आले.

सध्या संदीप यांची तब्येत सुधारत असून, हातातील हालचाल आणि संवेदना पुन्हा येऊ लागल्या आहेत. काही आठवड्यांत त्वचा प्रत्यारोपण (स्किन ग्राफ्टिंग) करण्यात येणार आहे.

कुटुंबीयांनी समाधान व्यक्त करत म्हटले,

“डॉक्टरांनी ज्या वेळी आणि ज्या पद्धतीने उपचार केले, त्यामुळे हात वाचवता आला. आम्ही त्यांच्या ऋणी आहोत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

शिवक्रांती प्रतिष्ठान संस्थेतर्फे भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्यदिव्य मंदिर

छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील पहिले भव्यदिव्य मंदिर, भिवंडीतील मराडे पाडा या ठिकाणी…