सत्य परिचित – मिरा रोड (प्रतिनिधी) १९ जून :  भाईंदर पूर्व येथील गोल्डन नेस्ट परिसरातील बहुचर्चित बोटलनेक ब्रिज पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र यावेळी चर्चेचे कारण केवळ पुलाची रचना किंवा उद्घाटनाचा विलंब नसून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या भिन्न भूमिकांमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी एमएमआरडीएला ४८ तासांचा अल्टिमेटम देत पुलाचे तात्काळ उद्घाटन करण्याची मागणी केली आहे. पुलाचे काम पूर्ण होऊनही तो नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच ४८ तासांत पुलाचे उद्घाटन न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतः जेसीबीच्या सहाय्याने पुलावरील बॅरिकेड्स हटवून नागरिकांसाठी पुल खुला करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

राणे यांच्या म्हणण्यानुसार, चार पदरी रस्ता दोन पदरी होत असल्याने या पुलाची रचना सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. पुलाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. देशभरातून या पुलावर टीका झाली होती आणि काही महिन्यांपूर्वी हा विषय सोशल मीडियावर ट्रेंडही झाला होता. मात्र आता काम पूर्ण झाल्यानंतरही पुल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेला नाही, यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दुसरीकडे, याच पुलाबाबत मनसेचे विधानसभा अध्यक्ष सचिन पोपळे यांनी १० जून २०२६ रोजी एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांना पत्र देत पुलाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली होती. या पत्रात त्यांनी पुलाच्या रचनेमुळे भविष्यात अपघात होण्याची शक्यता असल्याचा दावा करत, पुल सुरू करण्यापूर्वी नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत लेखी हमी देण्याची मागणी केली होती.

तसेच भविष्यात या पुलावर अपघात अथवा जीवितहानी झाल्यास संबंधित ठेकेदार, अभियंते आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल का, याबाबतही स्पष्ट भूमिका जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली होती. पुलाच्या सुरक्षिततेबाबत समाधानकारक स्पष्टीकरण मिळाल्याशिवाय तो सुरू करू नये, अशी भूमिकाही पोपळे यांनी पत्रातून मांडली होती.

यामुळे एकाच पुलाच्या मुद्द्यावर मनसेच्या दोन प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भूमिका वेगवेगळ्या असल्याचे चित्र समोर आले आहे. एका बाजूला पुल तात्काळ नागरिकांसाठी खुला करण्याची मागणी होत असताना, दुसऱ्या बाजूला पुलाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. त्यामुळे मनसेमध्ये या विषयावर मतभिन्नता आहे का, याबाबत शहरातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर एमएमआरडीएची अधिकृत भूमिका काय असणार आणि पुलाचे उद्घाटन नेमके कधी होणार, याकडे मिरा-भाईंदरकरांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

प्रभाग ४ मध्ये अवैध बांधकामांना उधाण!!! स्वप्नील सावंत यांच्यावर नागरिकांचा रोष; महापालिकेची प्रतिमा मलिन होत असल्याची चर्चा

सत्य परिचित – भाईंदर (इरफान सय्यद), २६ नोव्हेंबर : मिरा रोडमधील हटकेश…