आरोपींना संरक्षण दिल्याचा आरोप; सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्याची मागणी
सत्य परिचित – मिरा रोड (प्रतिनिधी) १२ जून : अल्पवयीन विद्यार्थिनी अत्याचार प्रकरण मिरा-भाईंदर शहराला हादरवून सोडणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवरील कथित लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती तथा भाजपा नगरसेविका अनिता पाटील यांच्या दोन भावांची नावे समोर आल्यानंतर विविध सामाजिक संघटना, स्थानिक नागरिक तसेच शिवसेना आणि काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.
काशिमीरा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, पीडित मुलगी अल्पवयीन असताना तिच्यावर कथित लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील आरोपी राजेश चव्हाण याला पोक्सो कायद्यांतर्गत अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी याचे काही महिन्यांपूर्वी निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
पीडित मुलगी महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेत असताना शाळेतील कर्मचारी असलेल्या आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर तिचे फोटो व व्हिडिओच्या माध्यमातून अनेक वर्षे ब्लॅकमेल करण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
दरम्यान, पीडितेने अनेक वर्षांपूर्वीच संपूर्ण प्रकाराची माहिती संबंधित लोकप्रतिनिधींना दिली होती. मात्र त्यावेळी योग्य कारवाई झाली नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवाशांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्थानिक नागरिकांनी निषेध व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
शिवसेना महिला आघाडीचा आक्रमक पवित्रा
शिवसेना महिला आघाडीच्या वतीने पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांना निवेदन देण्यात आले असून आरोपींना संरक्षण दिल्याचा आरोप करत संबंधितांवर सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
महिला जिल्हा संघटक निशा नार्वेकर यांनी आरोप केला की, पीडितेला न्याय मिळवून देण्याऐवजी आरोपींना संरक्षण देण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.

काँग्रेसची राजीनाम्याची मागणी
काँग्रेसच्या विरोधी पक्ष नेत्या आफरीन सय्यद यांनी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारत महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतींनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर प्रकरणात निष्पक्ष चौकशी होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
प्रताप सरनाईक यांची मदतीची भूमिका
या प्रकरणात परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी पीडित मुलीच्या शिक्षण, पुनर्वसन आणि भविष्यासाठी आवश्यक मदत करण्याची भूमिका घेतल्याची माहिती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. पीडितेला न्याय मिळावा आणि तिच्या भवितव्याला आधार मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही सांगण्यात आले.
या संपूर्ण प्रकरणामुळे मिरा-भाईंदर शहरात संतापाची लाट उसळली असून दोषींवर कठोर कारवाई आणि निष्पक्ष तपासाची मागणी अधिक तीव्र झाली आहे.