सत्य परिचित – मिरा रोड (प्रतिनिधी) ११ जून : भाईंदर पश्चिमेतील उत्तन परिसरात जमिनीत गाडलेला जुन्या काळातील जिवंत तोफगोळा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र मिरा-भाईंदर पोलिस आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दल (एनएसजी) यांच्या सतर्कतेमुळे हा तोफगोळा सुरक्षितपणे निकामी करण्यात आला असून संभाव्य मोठी दुर्घटना टळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तन परिसरातील एका मोकळ्या जागेत नागरिकांना जमिनीत गाडलेली संशयास्पद धातूची वस्तू आढळून आली. सदर वस्तूची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली. प्राथमिक तपासात ही वस्तू साधी धातूची नसून अविस्फोटित स्फोटक सामग्री असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मिरा-भाईंदर पोलिसांनी तातडीने राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाशी (एनएसजी) संपर्क साधला. त्यानंतर एनएसजीचे विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण परिसर सुरक्षित करण्यात आला तसेच नागरिकांना त्या भागापासून दूर ठेवण्यात आले.

मंगळवारी सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास एनएसजीच्या तज्ज्ञांनी विशेष तांत्रिक प्रक्रियेच्या माध्यमातून तोफगोळा सुरक्षितपणे निकामी केला. तपासादरम्यान तोफगोळा अविस्फोटित आणि धोकादायक स्थितीत असल्याचे स्पष्ट झाले.

संपूर्ण कारवाईदरम्यान सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. या प्रक्रियेत कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. विशेष म्हणजे, नुकतेच क्षमता विकास उपक्रमांतर्गत मिरा-भाईंदर पोलिसांना आयईडी आणि विविध प्रकारच्या स्फोटकांची ओळख पटविण्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले होते. त्याच प्रशिक्षणाचा फायदा या घटनेत झाला असून पोलिसांनी वेळीच धोका ओळखत योग्य ती पावले उचलली.

उत्तनमध्ये आढळलेला हा जिवंत तोफगोळा वेळेत निकामी करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. मिरा-भाईंदर पोलिसांची सतर्कता आणि एनएसजीच्या तात्काळ कारवाईमुळे सुरक्षा यंत्रणांची सज्जता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

दरम्यान, सुरक्षा यंत्रणांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास तिला हात लावू नये किंवा हलविण्याचा प्रयत्न करू नये. अशा वस्तूंबाबत त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, जेणेकरून तज्ज्ञांकडून त्याची योग्य तपासणी व कार्यवाही करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील ऑगस्ट महिन्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा सन्मान

  मिरा-भाईंदर वसई-विरार: ऑगस्ट २०२५ महिन्यातील गुन्हेगारीचा आढावा घेण्यासाठी नुकत्याच झालेल्या मासिक…